सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
  • नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
 DIGITAL PUNE NEWS

आंतरमहाविद्यालयीन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत मॉडर्न कॉलेज विजेते; कमिन्स कॉलेज उपविजेते ;सिंहगडच्या आरएमडीएसटीआय कॅम्पस, वारजे येथे स्पर्धेचा उत्साहात समारोप

डिजिटल पुणे    13-10-2026 10:33:42

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर विभागीय क्रीडा समिती आणि सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आरएमडी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स कॅम्पस, वारजे येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन महिला व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६-२७ उत्साहात पार पडली. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ९ ऑक्टोबर रोजी झाला, तर १० ऑक्टोबर रोजी सर्व सामने पूर्ण झाल्यानंतर दिमाखदार समारंभात बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर संघाने विजेतेपद पटकावले, तर कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर संघाने उपविजेतेपद मिळवले. बी.एम.सी.सी. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील अंतिम सामना मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर आणि कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर या संघांमध्ये झाला. या सामन्यात मॉडर्न महाविद्यालयाने २-० अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. तृतीय क्रमांकासाठी बी.एम.सी.सी. महाविद्यालय आणि झील महाविद्यालय, नऱ्हे यांच्यात सामना झाला. या सामन्यात बी.एम.सी.सी. महाविद्यालयाने २-० अशा फरकाने विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत पुणे शहर विभागातील ३३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. सुमारे ४०० महिला खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या खेळाचे कौशल्य सादर केले.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजनकर मॅडम होत्या. यावेळी प्रा. अभिजित पारसे, डॉ. अंजुश्री अगस्टीन (जॉइंट सेक्रेटरी, पुणे शहर विभागीय क्रीडा समिती), निवड समितीचे सदस्य डॉ. सचिन पुणे, विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि खेळाडू उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डॉ. सुदाम शेळके यांनी सिंहगड संस्थेतील क्रीडा सुविधा व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. विद्यापीठाने स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सिंहगड संस्थेवर सोपविल्याबद्दल प्राचार्यांनी विद्यापीठाचे आभार मानले. तसेच सहभागी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

बक्षीस वितरण समारंभात विजेत्या मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, उपविजेत्या कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या बी.एम.सी.सी. महाविद्यालयाच्या संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आरएमडी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स कॅम्पसचे क्रीडा संचालक प्रा. राहुल निकम, रजिस्ट्रार श्री. सुहास दाभेकर, प्रा. स्वप्निल नाळे, डॉ. शिरीष क्षीरसागर तसेच ग्रंथपाल विभागातील श्री. अमोल नवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंहगड कॉलेज ऑफ सायन्सचे क्रीडा संचालक प्रा. संतोष नवले आणि आरएमडी कॉलेजची विद्यार्थिनी तनिष्का भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा संचालक प्रा. राहुल निकम यांनी केले. उत्कृष्ट नियोजन आणि क्रीडापूरक वातावरणामुळे स्पर्धेची सांगता उत्साहात झाली.


 Give Feedback



 जाहिराती