पुणे : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर स्थगिती मिळाली आहे. या आंदोलनात आपल्या आक्रमक भाषणामुळे राज्यभर चर्चेत आलेला कोल्हापूरचा विवेकानंद पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर विवेकानंद आपल्या मूळ गावी माजगाव येथे परतला. त्याच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विवेकानंदला फोन करून त्याचे अभिनंदन केले. “लढ्याला यश मिळालं, आता मुंबईला येऊन भेटून जा,” असा निरोप राज ठाकरेंनी दिल्याची माहिती विवेकानंदने दिली.
माजगावमध्ये विवेकानंद पाटीलचे जल्लोषात स्वागत
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विवेकानंद पाटील याने केलेल्या भाषणांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडल्यामुळे त्याची राज्यभर चर्चा झाली. आंदोलनातील घडामोडींनंतर तो कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या माजगाव या मूळ गावी परतला.
गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्याचे उत्साहात स्वागत केले. गावकऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमामुळे विवेकानंद भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्याने गावकऱ्यांशी संवाद साधत भाषणही केले. पुण्यातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी एकजुटीने मांडलेल्या मागण्यांमुळे हा लढा राज्यभर पोहोचल्याची चर्चा यावेळी झाली.
राज ठाकरेंनी फोन करून काय सांगितले?
MPSC आंदोलनादरम्यान विवेकानंद पाटीलला विविध राजकीय पक्षांतील नेत्यांचा पाठिंबा मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हेही त्याच्या संपर्कात होते.
याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील विवेकानंदशी फोनवरून संवाद साधला. या फोनबाबत माहिती देताना विवेकानंदने सांगितले की, आंदोलनातील भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. राज ठाकरेंनीही फोन करून त्याची विचारपूस केली आणि आंदोलनातील लढ्याला यश मिळाल्याचे सांगितले. तसेच, मुंबईत येऊन भेटण्याचे निमंत्रण दिले.राज ठाकरेंच्या या फोननंतर आपण मुंबईला जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे विवेकानंदने स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलनानंतर विवेकानंद आणि राज ठाकरे यांची संभाव्य भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही घेतली होती भेट
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर पुढील दोन दिवसांत चांगली बातमी मिळेल, असे संकेत राज ठाकरेंनी दिले होते.त्यानंतर सरकारने MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. सरकारकडून प्रमुख मागण्यांबाबत आश्वासने मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्यांबाबत सरकारचे आश्वासन?
पुण्यातील हे आंदोलन जवळपास 11 ते 12 दिवस सुरू होते. MPSC परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी सरकारचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर सरकारकडून पुढील बाबींवर आश्वासने देण्यात आली.
- विवेक भीमनवार यांची चौकशी : MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, सरकारने चौकशीचा मार्ग स्वीकारत त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले.
- पाच सदस्यीय चौकशी समिती : संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
- समितीचे अध्यक्ष आणि सदस्य : दिलीप भोसले यांच्याकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून, तुकाराम मुंढे यांचाही समितीत समावेश आहे.
- अधिकाऱ्यांची चौकशी : आयोगातील आजी-माजी अध्यक्षांसह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी केली जाणार आहे.
- आंदोलकांवरील गुन्हे : आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत ते मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- 70 हजार पदांची भरती : पुढील तीन वर्षांत 70 हजार रिक्त पदे भरण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
- गट-क पदांमध्ये वाढ : 2027 मध्ये होणाऱ्या गट-क भरतीतील पदांची संख्या वाढवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.
- तहसीलदार भरतीचे प्रमाण : 60-40 ऐवजी 50-50 प्रमाण लागू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.
- आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ : MPSC आयोगाची सदस्यसंख्या 11 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
- परीक्षा ऑफलाइन पद्धतीने : MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
- पोलीस भरतीचा अभ्यासक्रम : पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याची मागणी मान्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या मागण्यांबाबत सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पत्रावर मुख्य सचिवांची स्वाक्षरी असल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलन स्थगित; आता पुढील निर्णयांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
12 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने दिलेली आश्वासने आणि चौकशी समितीची स्थापना या निर्णयांनंतर आंदोलन मागे घेण्याऐवजी स्थगित करण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.
आता चौकशी समितीचा अहवाल, रिक्त पदांची भरती आणि परीक्षांबाबत सरकारकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, आंदोलनातील सक्रिय सहभागामुळे चर्चेत आलेल्या विवेकानंद पाटीलचे माजगावमध्ये झालेले स्वागत आणि राज ठाकरेंचा फोन यामुळे या आंदोलनाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. आता विवेकानंद पाटील मुंबईत जाऊन राज ठाकरेंची भेट कधी घेणार, याकडेही अनेकांचे लक्ष असेल.