सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्वच्छ मुंबईचा नारा, महापौर रितू तावडे थेट मैदानात; स्वतःच्या पक्षाच्या अनधिकृत फलकांवर कारवाई करत इशारा
  • दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय
 जिल्हा

अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी होणार गोड! सरकारकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांची भाऊबीज; 42.81 कोटींचा निधी मंजूर

डिजिटल पुणे    14-10-2026 16:48:52

मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयासाठी सरकारकडून 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली असतानाच, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने ही भाऊबीज भेट देण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

राज्यातील 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ

राज्यात सध्या 1 लाख 8 हजार 627 अंगणवाडी सेविका, तर 1 लाख 5 हजार 470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. अशा एकूण 2 लाख 14 हजार 97 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात भाऊबीज भेट म्हणून 2 हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी एकूण 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला व बालकल्याणाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाची दखल घेत दिवाळीच्या निमित्ताने ही रक्कम देण्यात येणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी आर्थिक मदत

दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीही सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्यात आणखी 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक पंचनाम्यांची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि अंगणवाडी कर्मचारी या दोन्ही घटकांना दिवाळीच्या काळात आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती