सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
  • इम्रान खानच्या अडचणी वाढल्या! 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; सीजेपी आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई
  • पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; ऑगस्ट 2027 पर्यंत महापालिकेचे नियोजन
 क्राईम

धाराशिव आणि पैठणमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना; दोन्ही प्रकरणांत पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल

डिजिटल पुणे    15-10-2026 12:10:32

धाराशिव/पैठण : राज्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असून, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अशाच दोन गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. धाराशिवमध्ये १६ वर्षे ९ महिन्यांच्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरात १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांत पॉक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धाराशिवमध्ये दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीने १३ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. मात्र, आरोपीने तिला शिवीगाळ केल्याचा तसेच या प्रकरणाची माहिती इतरांना दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथेही अत्याचाराची घटना

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातही एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात अप्पासाहेब रमेश बोडखे (वय २६) याच्याविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी संशयिताने मुलीला घरी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायदा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील करीत असून, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून तपास

धाराशिव आणि पैठण तालुक्यात समोर आलेल्या या दोन्ही घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन्ही प्रकरणांत पीडितांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती