सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
  • इम्रान खानच्या अडचणी वाढल्या! 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; सीजेपी आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई
  • पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; ऑगस्ट 2027 पर्यंत महापालिकेचे नियोजन
 शहर

धक्कादायक! वारजेतील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा अन्न परवाना निलंबित; स्वयंपाकघरात जिवंत झुरळांसह मृत झुरळांचे अवशेष, एफडीएची कारवाई

डिजिटल पुणे    15-10-2026 16:14:42

पुणे : पिझ्झा खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी आणि विशेषतः आपल्या मुलांना पिझ्झा खायला देणाऱ्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या डॉमिनोज पिझ्झा आउटलेटमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीदरम्यान गंभीर अस्वच्छता आढळून आली आहे. स्वयंपाकघरात आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या ठिकाणी जिवंत झुरळे तसेच मृत झुरळांचे अवशेष आढळल्याने प्रशासनाने या आउटलेटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

पुणे विभागातील २५ हून अधिक आउटलेट्सची तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) वारजे येथील मे. ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या डॉमिनोज पिझ्झा आउटलेटची तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वयंपाकघर आणि अन्नसाठवणूक क्षेत्रात झुरळे आढळल्याने स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एफडीएकडून पुणे विभागातील डॉमिनोज पिझ्झाच्या २५ हून अधिक आउटलेट्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये वारजे येथील आउटलेटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. याशिवाय अन्य दोन आउटलेट्समध्येही नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईसाठी न्यायनिर्णयनाची प्रकरणे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

स्वच्छतेसह अन्न हाताळण्याच्या पद्धतीतही त्रुटी

तपासणीदरम्यान केवळ झुरळेच नव्हे, तर अन्नपदार्थ हाताळण्याच्या पद्धतीतही त्रुटी आढळल्या. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे योग्य विभाजन करण्यात आले नव्हते. तसेच अन्नपदार्थ स्वीकारताना आवश्यक तापमानाच्या नोंदी अपूर्ण असल्याचेही समोर आले.

याशिवाय स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेत कमतरता, अन्नपदार्थांची अयोग्य पद्धतीने साठवणूक आणि ग्राहकांसाठी असलेल्या जेवणाच्या जागेतील स्वच्छतागृहातून दुर्गंधी येत असल्याचे तपासणीत आढळले. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत एफडीएने संबंधित आउटलेटविरोधात कारवाई केली.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पिझ्झा आणि फास्ट फूडची आवड आहे. मुलांच्या आग्रहाखातर पालकही अनेकदा त्यांना बाहेरचे पदार्थ खायला घेऊन जातात. मात्र, अशा घटनांमुळे अन्नपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणची स्वच्छता, अन्नसाठवणुकीची पद्धत आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन याकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

अन्न तयार करण्याच्या जागेत झुरळे आढळणे ही आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची निवड करताना ग्राहकांनी स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाने नियमित तपासणी करून कठोर कारवाई करणे महत्त्वाचे ठरणार आहे.वारजेतील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटवरील कारवाईमुळे पुणे विभागातील इतर खाद्य आस्थापनांच्या स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती