पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २२ वर्षीय आयटी इंजिनिअरने इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत तरुणाकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सायबर फसवणुकीचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शिखर सक्सेना असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून पुण्यात नोकरी मिळाली होती. तो हडपसर येथील मगरपट्टा सिटी परिसरातील एका कंपनीत ‘अॅडव्हान्स इंजिनिअरिंग अॅनालिस्ट’ म्हणून काम करत होता. नोकरीच्या निमित्ताने तो खराडी परिसरात पीजीमध्ये राहत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बनावट पोलीस अधिकारी बनून दिली अटकेची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शिखरशी संपर्क साधून त्याच्याविरोधात अमली पदार्थांची विक्री केल्याची तक्रार असल्याचे सांगितले. या प्रकरणात त्याला अटक होऊ शकते, अशी भीती घालण्यात आली. आरोपींनी स्वतःची ओळख पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्याच्यावर दबाव आणल्याचा संशय आहे. या धमक्यांमुळे शिखरला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात ‘ड्रग्स इन पार्सल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सायबर फसवणुकीच्या प्रकाराचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीत संबंधित व्यक्तीच्या नावाने संशयास्पद पार्सल आल्याचे किंवा त्याचा अमली पदार्थांच्या प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगून भीती निर्माण केली जाते. त्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.
फोन कॉलमुळे वाढला संशय
तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने शिखरच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद असल्याने कॉल त्याच्या आईच्या मोबाईलवर वळवला गेला. संबंधित व्यक्तीने शिखरबाबत विचारणा केली आणि तो पुण्यात असल्याचे समजल्यानंतर फोन बंद केला.
या घटनेची माहिती शिखरच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने आपले नाव ‘अजयकुमार’ असल्याचे सांगितले आणि काही पीडीएफ फाइल्स मिळवण्यासाठी फोन केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्याने शिखरशी ऑनलाइन गेम ‘पब्जी’ खेळताना ओळख झाल्याचा दावा केला. मात्र, शिखर हा गेम खेळत नसल्याचे वडिलांनी सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन कट केला.
काही वेळाने पुन्हा संपर्क साधला असता, त्या व्यक्तीने आपण हरियाणातील पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. शिखरविरोधात अमली पदार्थ विक्रीची तक्रार असल्याने त्याला अटक करायची असल्याचा दावा त्याने केला. या संभाषणामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी शिखरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
२७ व्या मजल्यावरून उडी; कुटुंबीयांना मोठा धक्का
मुलाशी संपर्क होत नसल्याने शिखरचे वडील पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्याचवेळी पुण्यात राहणारे त्याचे काका खराडी पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी सुरुवातीला अपहरणासंदर्भात गुन्हा नोंदवून शोध सुरू केला. शिखरला ओळखणाऱ्या काही व्यक्तींनी त्याचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावरही प्रसारित केली.
दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास खराडी येथील रिव्हरडल सुइट्स या २७ मजली इमारतीच्या रेफ्युजी एरियातून उडी मारल्याने शिखरचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही इमारत त्याच्या राहत्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर होती. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
लॅपटॉपमध्ये सापडले पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट
शिखरच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्याचा लॅपटॉप तपासला. त्यावेळी २९ सप्टेंबर रोजी ‘अजयकुमार’ नावाशी संबंधित वेगवेगळ्या खात्यांमध्ये ऑनलाइन पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट सेव्ह असल्याचे आढळले. या डिजिटल पुराव्यांमुळे प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या संपर्काचा तपास महत्त्वाचा ठरला आहे.
तक्रारीनुसार, शिखरच्या मृत्यूनंतरही कुटुंबीयांना अनोळखी व्यक्तींकडून फोन येत राहिले. १३ ऑक्टोबर रोजी त्याच्या वडिलांना दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण कुरिअर कार्यालयात काम करत असल्याचे सांगून शिखरबद्दल विचारणा केली. मात्र, वडिलांनी अधिक माहिती विचारताच संबंधित व्यक्तीने फोन बंद केला.
या घटनांनंतर शिखरचे वडील १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा पुण्यात आले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. वारंवार फोन करून पैशांची मागणी करणे, खोट्या ड्रग्स प्रकरणात अडकवण्याची धमकी देणे आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
शिखरचे वडील कुमारगौरव सक्सेना यांच्या तक्रारीवरून खराडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३०८(६), ३५१(४) यांसह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि ऑनलाइन व्यवहारांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.
या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे यांनी आरोपी सायबर फसवणूक करणारे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, इतर सर्व शक्यतांचाही तपास केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या माहितीनुसार, शिखरचा मोबाईल पासवर्डने लॉक असल्याने तो अनलॉक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती पोलीस अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी महाराष्ट्राबाहेर असण्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. शिखर आणि आरोपी यांच्यात संपर्क कसा झाला, पैशांचे व्यवहार कोणत्या खात्यांमध्ये झाले आणि या प्रकरणामागे सायबर गुन्हेगारी टोळी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
‘माझ्या मुलाला न्याय मिळावा’; वडिलांची मागणी
शिखरच्या अकाली मृत्यूने त्याच्या आई-वडिलांसह लहान बहिणीला आणि संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. शिखर हा अभ्यासात हुशार आणि करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेला तरुण होता. कॅम्पस प्लेसमेंटमधून त्याला पुण्यात नोकरी मिळाली होती आणि ही त्याची पहिलीच नोकरी होती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
“माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.या घटनेमुळे सायबर गुन्हेगारांकडून पोलीस अधिकारी असल्याचे भासवून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.