सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तोपर्यंत निर्णय संसदेत होतील, हा भारत आहे, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश नाही, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं...
  • दिल्लीमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वीच तणाव; तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
  • पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सीला ब्रेक! परवानगी मिळेपर्यंत सेवा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
 राज्य

दिल्लीमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वीच तणाव; तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

डिजिटल पुणे    16-10-2026 17:30:13

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. हातात तिरंगा घेऊन कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कच्या दिशेने निघालेले सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला परवानगी नसल्याचे कारण पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे आंदोलनापूर्वीच दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ पक्षाकडून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे एकत्र येऊन तिरंगा रॅली काढण्याचे आवाहन सीजेपीने केले होते. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

आंदोलनापूर्वीच पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी यापूर्वी अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आंदोलनात सहभागी न होण्याबाबत नोटीस दिली होती. त्यानंतर दिपके हे हातात तिरंगा घेऊन आंदोलनस्थळाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाला परवानगी नसल्याचे कारण यावेळी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या कारवाईनंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, पक्षाकडून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘दिल्ली ठप्प करून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न?’

आंदोलनासाठी निर्बंध लागू करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून सीजेपीने भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान संपूर्ण दिल्ली ठप्प करत असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसत आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेविरोधात सीजेपीने हे आंदोलन आयोजित केले होते. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून निषेध नोंदवण्याची पक्षाची भूमिका होती. मात्र, आंदोलन सुरू होण्याआधीच अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्याने पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

दिल्ली पोलिसांकडून पाळत ठेवल्याचा दिपकेंचा आरोप

दरम्यान, दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणेकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी केला होता. मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात दावे केले होते. आपण घराबाहेर पडल्यावर नंबर प्लेट नसलेली संशयास्पद वाहने आणि साध्या वेशातील पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

दिल्ली पोलीस आपल्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात किंवा अटक करू शकतात, अशी भीतीही दिपके यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आंदोलनस्थळी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांच्या आरोपांची आणि पोलिसांच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे सीजेपीकडून आंदोलनाची तयारी करण्यात आली होती, तर दुसरीकडे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे चित्र आहे. अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाचे पुढील स्वरूप काय असेल आणि या प्रकरणावर पोलिसांकडून अधिकृतपणे काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती