सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या
  • रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
  • अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या
 जिल्हा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बीडमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा;दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला तत्पर कार्यवाहीच्या सूचना

डिजिटल पुणे    17-10-2026 18:20:17

 बीड : पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा तसेच प्रशासकीय उपाययोजनांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.या बैठकीस आमदार प्रकाश सोळुंके, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना

सध्या पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक करपले असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. बहुतांश पंचनामे पूर्ण होत आले असून अहवाल प्राप्त होताच नियमानुसार पुढील कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पीक विमा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि अचूकता राखण्याचे निर्देश संबंधित कृषी व महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुष्काळ आणि टंचाईच्या काळात नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा, लग्न आणि वाढदिवसांवरील खर्च टाळावा तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे, असे आवाहन केले.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या टँकर्सवर जीपीएस (GPS) प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्यायोग्य पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी करू नये आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय जलस्रोतांचे पुनर्भरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि विहिरींची दुरुस्ती यांसारखी जलसंवर्धनाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केल्या.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पूर्वनियोजन करावे आणि शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोपोनिक्स तसेच अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे, असे बैठकीत सांगण्यात आले. वीबी-जी रामजी योजनेअंतर्गत रोजगार हमीची कामे जलसंवर्धनाशी जोडून प्रभावीपणे राबवावीत, जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांना स्थानिक पातळीवरच हक्काचा रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांच्यावर स्थलांतराची वेळ येणार नाही.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी थांबून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, तसेच शेतकऱ्यांशी संवाद वाढवून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांना मानसिक आधार द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. पाणी, चारा आणि रोजगारनिर्मिती या सर्व बाबींवर समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असेही आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले. वाढत्या दुष्काळी संकटात शासन आणि प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात आहेतशेतकरी बांधवांना या नैसर्गिक संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना तातडीने सावरण्यासाठी राज्य शासन सर्व स्तरांवर उपाययोजना करत असून प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यानी यावेळी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती