सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड! सूरत एक्स्प्रेसमधून संशयित ताब्यात, राजस्थानमध्येही पोलिसांची कारवाई
 विश्लेषण

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड! सूरत एक्स्प्रेसमधून संशयित ताब्यात, राजस्थानमध्येही पोलिसांची कारवाई

डिजिटल पुणे    19-10-2026 11:57:23

मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, मुंबई पोलिसांनी संशयितांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरत एक्स्प्रेसमधून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, राजस्थानमधील कोटा येथेही पोलिसांनी संशयितांविरोधात कारवाई केली आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचा या गोळीबारातील सहभाग अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही.

रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे टायगर श्रॉफच्या गाडीवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या वेळी आरोपींनी गाडीच्या दिशेने सात गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित बचावला; मात्र त्याचा वाहनचालक आणि गर्दीत उपस्थित असलेला एक पादचारी जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले होते.

सूरत एक्स्प्रेसमधून संशयित ताब्यात

गोळीबारानंतर आरोपींचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी विविध पथके तैनात केली. तपासादरम्यान हल्लेखोरांनी अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकी सोडून लोकलने बोरिवली गाठल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तेथून एक्स्प्रेस ट्रेनने सुरतच्या दिशेने प्रवास केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याच अनुषंगाने पोलिसांनी सूरत एक्स्प्रेसमधून संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, राजस्थानमधील कोटा शहरातही पोलिसांनी तीन संशयितांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांपैकी एक जण महाराष्ट्रातील, तर दोघे हरियाणातील असल्याचे सांगितले जात आहे. या संशयितांना घेऊन पोलिसांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या सर्व कारवायांमध्ये ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची संख्या आणि त्यांचा गोळीबाराशी असलेला संबंध याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

टायगर श्रॉफच्या हालचालींवर आधीच लक्ष?

या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तपासात टायगर श्रॉफचे निवासस्थान तसेच तो नियमितपणे फुटबॉल खेळण्यासाठी जात असलेल्या मैदानाची आधीच पाहणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यापूर्वी अभिनेत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत होते का, याचाही तपास केला जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, रेकी करणाऱ्या व्यक्तींनी टायगर श्रॉफ कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि तो नेहमी कोणत्या ठिकाणी जातो, याची माहिती हल्लेखोरांपर्यंत पोहोचवली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

संशयितांच्या चौकशीतून काय उघड होणार?

सूरत एक्स्प्रेस आणि राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या कारवाईनंतर या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर गोळीबारामागील कारण, हल्ल्याचे नियोजन आणि इतर सहभागी व्यक्तींबाबत माहिती मिळू शकते. मात्र, संशयित हेच प्रत्यक्ष गोळीबार करणारे आरोपी आहेत का, याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास सुरू असून, पुढील चौकशीतून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती