मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मनोरंजन विश्वासह मुंबईत खळबळ उडाली आहे. जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे घडलेल्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात आहे. टायगर श्रॉफ नेमका कुठे आहे, याची माहिती हल्लेखोरांना कशी मिळाली? हल्ल्यानंतर आरोपी कोणत्या मार्गाने पसार झाले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.
पीआर टीमच्या मेसेजमुळे लोकेशन उघड झाल्याचा संशय
टायगर श्रॉफ फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी टर्फवर गेला होता. सामना संपल्यानंतर तो परतत असताना त्याच्या वाहनावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अभिनेत्याच्या हालचालींची माहिती हल्लेखोरांपर्यंत कशी पोहोचली, याचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टायगरच्या पीआर टीमने पापाराझींच्या ग्रुपमध्ये शेअर केलेल्या मेसेजमधून त्याच्या ठिकाणाची माहिती मिळाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. या शक्यतेच्या अनुषंगाने एका संशयिताची चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. याशिवाय, हल्लेखोर काही दिवसांपासून टायगरच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवून होते का, याचाही तपास सुरू आहे.
फुटबॉल सामना संपेपर्यंत आरोपींची प्रतीक्षा
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संशयित आरोपी टायगर श्रॉफचा फुटबॉल सामना संपण्याची सुमारे ४५ मिनिटे वाट पाहत होते. सामना सुरू असताना टायगर सुरक्षा जाळीजवळ आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्या वेळी हल्ला करण्यात आला नाही.यानंतर टायगर परतत असताना गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या वेळी नेमके काय घडले आणि आरोपींनी हल्ल्यासाठी कोणती वेळ निवडली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे.
तीन वेगवेगळ्या दिशांनी पळून जाण्याची योजना
हल्ल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी आरोपींनी वेगवेगळे मार्ग निवडल्याचा संशय आहे. तिन्ही आरोपी गर्दीचा फायदा घेत तीन दिशांनी पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. मात्र, काही कॅमेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे आरोपींची स्पष्ट छायाचित्रे मिळवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे असल्याची माहितीही तपासातून समोर आल्याचे वृत्त आहे.या हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तरुणांना पैशांचे आमिष दाखवून या गुन्ह्यात सहभागी करून घेतले गेले का, याचाही तपास केला जात आहे.
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ सोडली दुचाकी
या गोळीबारासाठी पल्सर दुचाकीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर ही दुचाकी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ सोडून देण्यात आली होती. तपासादरम्यान दुचाकीच्या मालकीसंबंधी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात आहे.ही दुचाकी मूळ मालकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि त्यानंतर तिसऱ्या व्यक्तीकडे विकली गेल्याची माहिती आहे. दुचाकीच्या मूळ मालकाचा संबंध जोगेश्वरी परिसराशी असल्याचेही वृत्त आहे. वाहनाची खरेदी-विक्री झाली असली, तरी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे दुचाकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
हल्ल्यात वापरलेल्या शस्त्रांबाबतही तपास
या प्रकरणात वापरण्यात आलेल्या पिस्तुलांच्या क्षमतेबाबतही माहिती समोर आली आहे. एका पिस्तुलामध्ये एकदा गोळ्या भरल्यानंतर नऊ गोळ्या झाडता येत असल्याचे वृत्त आहे. शस्त्रांचा स्रोत, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि गोळीबारामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक तपासातून मिळणारे निष्कर्षही या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहेत.
टायगर सुखरूप; चालकासह दोघे जखमी
पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत टायगर श्रॉफला थेट गोळी लागलेली नाही. मात्र, गोळीबारामुळे वाहनाची काच फुटली आणि तिचा तुकडा उडून त्याला दुखापत झाली. टायगरचा चालक फिरदौस याच्या डाव्या हाताला गोळी लागली, तर उमेश चौहान नावाचा रिक्षाचालकही जखमी झाला. दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गुन्हे शाखेकडून पुढील तपास
या घटनेची सुरुवातीला जुहू पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आरोपींची ओळख, हल्ल्यामागील सूत्रधार, दुचाकीची खरेदी-विक्री आणि टायगरच्या लोकेशनची माहिती कशी मिळाली, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.या प्रकरणात तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.