पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांना वडगाव मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, पोलीस संरक्षण द्यावे, टाटा प्रकल्प आणि एमआयडीसी मधील गौण खनिज उत्खननाची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी सुनील गुजर, करुणा सरोदे यांनी आज केली.
आज १९ ऑक्टोबर रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट करून आमदार शेळके यांच्या गैर व्यवहारांच्या विरोधात संघर्ष सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर(तालुका मावळ)यांनी वडगाव मावळ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांच्या खाणींच्या रॉयल्टी बुडविण्याचे गैरव्यवहारबाबत माहिती अधिकारात माहिती काढल्याने त्यांना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एका खोलीत बंद करून आमदार शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ,मारहाण केली होती.
बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी सुनील शेळके आणि त्यांच्या सहकार्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन तपास अधिकाऱ्यांना जलद तपास करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. आमदार शेळके यांनी शिवीगाळ आणि मारण करत असताना गुजर यांच्याकडील बॅग हिसकावून घेऊन त्यातील महत्त्वाचे कागदपत्रे , गैर व्यवहारांसंबंधीचे कागद गहाळ केली, करुणा सरोदे या महिला कार्यकर्त्याला धक्काबुक्की केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवत होतो की ते आमच्यावर पाळत ठेवत होते ,याची चौकशी केली जावी असेही आव्हान त्यांनी दिले.
या पत्रकार परिषदेला सुनील गुजर ,करुणा सरोदे, यांच्या सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील गुजर म्हणाले,' माहिती अधिकारांमध्ये प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराची माहिती गोळा करणे आणि त्याबद्दल कारवाईसाठी प्रयत्न करणे ही माहिती अधिकार कार्यकर्तेचे कामच आहे . मारहाण करून दबाव आणण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.'
आंबळे (तालुका मावळ ) येथील अवैध खाणींची जागा संविधानिक आमदारकीच्या पदाचा गैर वापर करून MIDC ला अदला-बदली करून दिलेली हजारो कोटींची रॉयल्टी व हजारो कोटींची MIDC ची सपाट जागा मिळवणे अशी अनेक प्रकरणे ,अनेक गैरव्यवहार प्रशासकीय अधिकारी आमदार शेळके यांच्या दबावामुळे दडपत आहेत, टाटा प्रकल्पातील गौण खनिज उत्खननाची माहिती दडपत आहेत, शेळके यांच्यासहित त्यांच्या कुटुंबीयांचा यामध्ये थेट सहभाग आहे,असे सुनील गुजर आणि सहकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी राजकीय दबावामुळे अदखलपात्र गुन्हा म्हणुन नोंद करून घेतली,दलित महिलेला शिवीगाळ व धक्काबुक्की होऊन देखील गुन्हा दाखल का नाही,प्रशासन मोठे की राजकीय गुन्हेगार , गावगुंड मोठे? हा प्रश्न निर्माण झालेला आहे, असे मुद्दे सुनील गुजर , करुणा सरोदे यांनी या पत्र परिषदेत उपस्थित केलेशेळके यांचे अवैध क्रशर व खाणी दिवसाढवळ्या चालू आहेत, तसेच MIDC ला दिलेल्या खड्डेमय जागेत अजून उत्खनन चालू आहे, असेही ते म्हणाले.