सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब;काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
  • दसरा कार्यक्रमात रणबीर कपूरची जीभ घसरली! ‘सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल’ म्हणताच ट्रोलिंग, अभिनेत्याने मागितली माफी
  • जपानमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात, दुसऱ्याच दिवशी भारतात परत पाठवले
 DIGITAL PUNE NEWS

‘जरांगे पाटील, ही क्लिप दोन वर्षे का दाबून ठेवली?’; रामदास कदमांचा सवाल, एकनाथ शिंदेंवरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी

डिजिटल पुणे    22-10-2026 16:29:18

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. कथित ऑडिओ क्लिप १४ ऑक्टोबर २०२४ रोजीची असल्याचा दावा करत, ही क्लिप इतके दिवस का समोर आणली नाही, असा सवाल त्यांनी जरांगे पाटील यांना केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही कदम यांनी केली.

रामदास कदम म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांनी समोर आणलेली कथित ऑडिओ क्लिप जुनी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे २०२४ पासून ही क्लिप आपल्याकडे असताना ती त्याच वेळी सार्वजनिक का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळातही ही क्लिप समोर आली नव्हती. मग आता ती बाहेर येण्यामागचे नेमके कारण काय, याचा खुलासा होणे आवश्यक असल्याचे कदम यांनी म्हटले.

‘मराठा समाजासाठी एकनाथ शिंदेंचेही योगदान’

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी प्रयत्न केले असून, आता त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होत असताना जरांगे पाटील यांनी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे कदम म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर बाजू मांडण्यासाठी झालेल्या अभ्यासाबाबतही त्यांनी भाष्य केले. या संदर्भात विनोद पाटील यांना विचारावे, असा सल्ला कदम यांनी जरांगे पाटील यांना दिला. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाईसाठी चर्चा नेमकी कोणाच्या निवासस्थानी झाली होती, याची माहिती विनोद पाटील देऊ शकतील, असेही ते म्हणाले.

कथित ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची चौकशी करण्याची मागणी

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काही व्यक्तींमधील संभाषण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अशा संभाषणाच्या आधारे कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचे आरोप केले जात असतील, तर त्यामागील सत्य समोर येणे गरजेचे आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले. क्लिपमध्ये संभाजीनगर, ठाणे आणि मुंबईशी संबंधित उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले.

केवळ संभाषणाच्या आधारे आरोप करून एखाद्या नेत्याची प्रतिमा मलिन करणे योग्य नाही. या प्रकरणात नेमके काय घडले, पैशांचा व्यवहार झाला होता का आणि आरोपांमध्ये तथ्य आहे का, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘आणखी एक क्लिप बाहेर येणार’; रामदास कदमांचा दावा

या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी आणखी एका कथित क्लिपचा उल्लेख केला. मनोज जरांगे पाटील यांच्या एका गोपनीय बैठकीत भाजपचे आमदार उपस्थित होते, असा दावा करत त्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचे कदम म्हणाले. संबंधित आमदाराचे नाव सांगण्याचे त्यांनी टाळले. मात्र, या प्रकरणाशी संबंधित माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कथित बैठकीत शिंदे यांचे समर्थक असल्याबाबत करण्यात आलेल्या टिप्पणीमुळे मराठा समाजातील नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, अशी चिंता कदम यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्याऐवजी समाजाची एकजूट टिकवण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्याकडे निवेदन देणार

एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी कोणी जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या क्लिप तयार करून प्रसारित करत असेल, तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे रामदास कदम म्हणाले. कथित क्लिपमध्ये एका महिलेने डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पैसे पोहोचवल्याचा उल्लेख केल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित महिला कोण आहे, पैसे कुठे दिले गेले आणि त्या महिलेकडे पैसे आले कुठून, याची तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी केली.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कथित ऑडिओ क्लिपमागील सत्य लवकरात लवकर समोर यावे आणि आरोपांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली.दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप आणि रामदास कदम यांनी उपस्थित केलेले प्रश्न यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यातील आरोपांची पुष्टी अद्याप स्वतंत्रपणे झालेली नसल्याने, चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती