सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब;काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
  • दसरा कार्यक्रमात रणबीर कपूरची जीभ घसरली! ‘सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल’ म्हणताच ट्रोलिंग, अभिनेत्याने मागितली माफी
  • जपानमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात, दुसऱ्याच दिवशी भारतात परत पाठवले
 विश्लेषण

पुण्यात ड्राय डेचा कालावधी घटला! आता तीन दिवस नव्हे, फक्त मतदानाच्या दिवशीच मद्यविक्री बंद; न्यायालयाच्या निर्देशानंतर सुधारित आदेश जारी

डिजिटल पुणे    22-10-2026 19:04:40

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याच्या आदेशात बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रशासनाने सुधारित आदेश जारी केला असून, यापूर्वी तीन दिवसांसाठी लागू करण्यात आलेला ड्राय डे आता मर्यादित करण्यात आला आहे. त्यानुसार, २३ ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीच्या आदेशानुसार तीन दिवसांचा ड्राय डे जाहीर करण्यात आला होता.

मात्र, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. याचिकांवरील सुनावणीनंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मद्यविक्री बंद ठेवण्याचा कालावधी कमी करण्यात आला. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात तीन दिवसांऐवजी केवळ मतदानाच्या दिवशीच ठरावीक वेळेसाठी मद्यविक्री बंद राहणार आहे.

कोणत्या वेळेत मद्यविक्री बंद राहणार?

सुधारित आदेशानुसार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध असतील. या कालावधीत संबंधित अधिसूचित क्षेत्रातील देशी व विदेशी मद्यविक्रीची दुकाने, बीअर आणि वाईन विक्री केंद्रे, बार, क्लब तसेच हॉटेलमधील मद्यविक्री बंद ठेवावी लागणार आहे.मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असल्याने मतदान संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. न्यायालयाच्या निर्देशांनंतर पुणे जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सुधारित आदेश जारी केला आहे.

विधान परिषद निवडणुकीचे वेळापत्रक

- अधिसूचना जारी : २९ सप्टेंबर २०२६

- उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर २०२६

- अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर २०२६

- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०२६

- मतदान : २३ ऑक्टोबर २०२६, सकाळी ८ ते दुपारी ४

- मतमोजणी व निकाल : २७ ऑक्टोबर २०२६

कोणत्या पाच जागांसाठी निवडणूक?

महाराष्ट्र विधान परिषदेतील मुदत संपणाऱ्या पाच जागांमध्ये पुढील मतदारसंघांचा समावेश आहे.

१. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : सतीश भानुदास चव्हाण

२. पुणे पदवीधर मतदारसंघ : अरुण गणपती लाड

३. नागपूर पदवीधर मतदारसंघ : अभिजीत गोविंदराव वंजारी

४. अमरावती शिक्षक मतदारसंघ : किरण रामराव सरनाईक

५. पुणे शिक्षक मतदारसंघ : जयंत दिनकर आसगावकर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ड्राय डेच्या कालावधीत झालेल्या या बदलामुळे मद्यविक्रीवरील निर्बंध आता केवळ मतदानाच्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती