सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच’; ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा संताप, फडणवीसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी
  • सुशीलकुमार शिंदेंनी भाजपची ऑफर नाकारली, भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे मी बघितलयं
  • नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर रक्तरंजित थरार! लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा दुर्दैवी अंत
 क्राईम

चुलत्याच्या घरातील १५ तोळे सोनं चोरलं, १० लाखांत थार खरेदी केली! कारच्या पूजेलाही चुलत्यालाच बोलावलं; पन्हाळ्यातील धक्कादायक प्रकार

डिजिटल पुणे    23-10-2026 12:34:46

कोल्हापूर : चुलत्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून त्यातून मिळालेल्या पैशांत थेट महिंद्रा थार कार खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात उघडकीस आला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या पुतण्याने सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. या दागिन्यांची विक्री करून मिळालेल्या पैशांत त्याने दहा लाख रुपयांची थार खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, नवीन कारच्या पूजेसाठी त्याने ज्या चुलत्याच्या घरात चोरी केली, त्यांनाच आवर्जून निमंत्रण दिले. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी समर चव्हाण आणि चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या आरोपावरून सोनार संग्राम मोरे यांना ताब्यात घेतले आहे.

महिनाभरापूर्वी दागिन्यांची चोरी

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे समर पोपट चव्हाण हा आपल्या कुटुंबीयांसह राहतो. त्याचे चुलते उमेश मारुती चव्हाण यांचे घर जवळच आहे. साधारण महिनाभरापूर्वी उमेश चव्हाण यांच्या घरातून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या दागिन्यांची किंमत अंदाजे दहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

समरने गावातील सोनार संग्राम बाबासो मोरे याला हे दागिने विकल्याचा आरोप आहे. दागिने विकून मिळालेल्या पैशांतून त्याने महिंद्रा कंपनीची थार कार खरेदी केली. नवीन गाडी घरी आणल्यानंतर त्याने कारच्या पूजेसाठी चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही बोलावले.

पूजेसाठी दागिने काढताना चोरी उघड

थारच्या पूजेसाठी जाण्यापूर्वी उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परिधान करण्यासाठी दागिने शोधले. मात्र, ज्या ठिकाणी दागिने ठेवले होते, तेथून ते गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे घरातील सोन्याच्या चोरीचा प्रकार उघड झाला.

या घटनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे घरात ठेवलेले आजीचे दागिने सुरक्षित होते. मात्र, उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिने चोरीला गेले होते. त्यामुळे चोरी करणारी व्यक्ती घरातील किंवा जवळच्या परिचयातील असावी, असा संशय त्यांना आला.

नवीन थारमुळे पुतण्यावर संशय

दागिने चोरीला गेल्याप्रकरणी उमेश चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, समरने अचानक नवीन थार कार कशी खरेदी केली आणि त्यासाठी पैसे कुठून आणले, याची चौकशी करण्यात आली. त्यातून चोरीच्या प्रकरणात समरचे नाव समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी समर चव्हाण तसेच चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या आरोपावरून सोनार संग्राम मोरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याचा तपास पोलीस करत आहेत.कोडोली पोलीस ठाण्याचे पर्यवेक्षणाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती