सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच’; ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा संताप, फडणवीसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी
  • सुशीलकुमार शिंदेंनी भाजपची ऑफर नाकारली, भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे मी बघितलयं
  • नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर रक्तरंजित थरार! लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा दुर्दैवी अंत
 क्राईम

नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर रक्तरंजित थरार! लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा दुर्दैवी अंत

डिजिटल पुणे    23-10-2026 16:50:20

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या मुद्द्यावरून झालेला वाद आणि प्रेयसीच्या चारित्र्याबाबत घेतलेला संशय यामुळे संतापलेल्या प्रियकराने तरुणीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला नेरुळ पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.

बसची वाट पाहत असताना तरुणीवर चाकूने हल्ला

सादिया जाकीर शेख असे मृत तरुणीचे नाव असून, ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड स्टाफ म्हणून कार्यरत होती. दानिश मोहम्मद अन्सारी (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही मुंबईतील वडाळा येथील अँटॉप हिल परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० तारखेला सकाळी सुमारे पावणे सात वाजण्याच्या सुमारास सादिया कामावर जाण्यासाठी नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरील बस थांब्यावर उभी होती. त्याचवेळी तेथे आलेल्या दानिशने तिच्यावर चाकूने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेली सादिया रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

वाशीहून सायन रुग्णालयात हलवले; उपचारादरम्यान मृत्यू

घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सादियाला तातडीने वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी उपचारांचे प्रयत्न केले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नेरुळ परिसरात खळबळ उडाली आहे.

चार वर्षांचे प्रेमसंबंध; लग्नावरून वारंवार वाद

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दानिश आणि सादिया यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याबाबतही विचार केला होता. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. सादिया लग्नास नकार देत असल्याने तसेच तिचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याचा संशय दानिशला असल्याने दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.याच वादातून आणि संशयातून आरोपीने सादियावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेमागील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांची दोन पथके; घणसोलीतून आरोपीला अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरुळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तयार केली. एका पथकाने आरोपीच्या वडाळा येथील निवासस्थानी तपास केला, तर दुसऱ्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे घणसोली परिसरात शोधमोहीम राबवली.

तपासादरम्यान आरोपी दानिश हा घणसोली येथे आपल्या बहिणीच्या घरी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नेरुळ पोलीस करत असून, हत्येमागील नेमकी परिस्थिती आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू आहे


 Give Feedback



 जाहिराती