मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित देवाणघेवाणीचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. ‘हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे,’ अशा तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ऑडिओ क्लिपच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारापासून माध्यमांवर दबाव आणण्यापर्यंत आणि विशिष्ट मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष वळवण्याबाबत चर्चा असल्याचा दावा केला जात आहे. या संभाषणाची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नसताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही क्लिप सुमारे दोन वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जात असताना ती आताच समोर येण्यामागचे कारण काय, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
‘फ्रेंडशिप फाईल’चा उल्लेख करत राज ठाकरेंचा निशाणा
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून या प्रकरणावर भाष्य केले. सध्या महाराष्ट्रात कथित ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिपची चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी या संभाषणात भाजपशी संबंधित काही पदाधिकारी, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही युट्यूब प्रभावकांचा उल्लेख असल्याचा दावा केला.
या कथित संभाषणात ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख तसेच माध्यमांवर प्रभाव टाकणे आणि भावनिक मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासंदर्भातील चर्चा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या क्लिपमधील आर्थिक व्यवहाराच्या दाव्यांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगतानाच, माध्यमांवर दबाव आणण्याच्या कथित प्रयत्नांबाबतही गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘तुमच्या पाठीमागे काय सुरू आहे, याचीही तपासणी करा’
मुख्यमंत्र्यांनी केवळ ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल मागवून थांबू नये, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. क्लिपमधील आवाज आणि संभाषणाची सत्यता तपासणे महत्त्वाचे असले, तरी त्यामध्ये करण्यात आलेल्या कथित चर्चांचीही चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संभाषणातील दावे गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आपल्या मागे नेमके काय घडत आहे, याचीही माहिती घेण्याचे आवाहन केले. केवळ तांत्रिक तपासणीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित न करता, या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘अन्यथा फॉरेन्सिक अहवालावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल’
ही ऑडिओ क्लिप दोन वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जात असेल, तर ती बाहेर कशी आली आणि ती कोणी समोर आणली, याचाही शोध घेतला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. या प्रकरणामागे सत्ताधारी गटातील राजकीय संघर्ष असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
फॉरेन्सिक तपासाच्या तांत्रिक बाबींमध्ये जनतेला गुंतवून न ठेवता चौकशी पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस किती निष्पक्षपणे या प्रकरणाची हाताळणी करतात आणि दोषींवर काय कारवाई होते, हे महाराष्ट्राला दिसले पाहिजे. अन्यथा, सरकारच्या सोयीने फॉरेन्सिक अहवालाचा वापर केल्याचा संशय निर्माण होऊ शकतो, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता आणि त्यातील आरोपांची पुष्टी तपासातूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.