सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
  • 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
  • कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा, हातात थाळ्या-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा : सयाजी शिंदे
  • मोठी बातमी : तीन तासांपासून लोकल जागच्या जागी उभ्या, सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बोजवारा!
  • मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे? कर्जतमधील वृक्षतोडीवरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
  • आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात युवक शिरला; हातातील बोर्डने लक्ष वेधले, सह्याद्रीचं जंगल वाचवण्याची आर्त हाक
 DIGITAL PUNE NEWS

राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर धडक; काही जण जखमी, राहुल गांधी सुरक्षित

डिजिटल पुणे    26-10-2026 17:10:01

उत्तर प्रदेश : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांचा उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असताना ताफ्यातील काही वाहने एकमेकांवर आदळली. प्राथमिक वृत्तानुसार, या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असून राहुल गांधी सुरक्षित असल्याची माहिती आहे. वाहनांचा वेग हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचे वृत्त आहे.

राहुल गांधी हे दिल्लीहून लखनौ येथे पोहोचल्यानंतर विमानतळावरून थेट सुलतानपूरच्या दिशेने रवाना झाले होते. भाजप नेते अमित शाह यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात त्यांना खासदार-आमदार न्यायालयात हजर राहायचे होते. या प्रकरणात न्यायालयाकडून आज निकाल दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

भाजप नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. ८ मे २०१८ रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळूरु येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यात सोहराबुद्दीन शेख हत्याकांडाचा संदर्भ देत भाजप अध्यक्षांवर हत्येचा आरोप असल्याचा उल्लेख केला होता. याच विधानामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा विजय मिश्रा यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणात अमित शाह यांची २०१४ मध्ये निर्दोष मुक्तता झाली होती.

न्यायालयीन लढा अनेक वर्षांपासून सुरू

या तक्रारीच्या अनुषंगाने न्यायालयाने राहुल गांधी यांना २७ नोव्हेंबर २०२३ रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर राहुल गांधी न्यायालयात उपस्थित राहिले आणि त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

पुढे तक्रारदार विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन तो जुळवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर या निर्णयाला आव्हान देणारी पुनरीक्षण याचिकाही सत्र न्यायालयाने फेटाळली. अलाहाबाद उच्च न्यायालयानेदेखील संबंधित आदेशांना आव्हान देणारी याचिका फेटाळल्याचे वृत्त आहे.

निर्दोष मुक्ततेचा विश्वास असल्याचा वकिलांचा दावा

राहुल गांधी यांचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी या प्रकरणाच्या निकालाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांना न्याय मिळेल आणि त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी २६ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात चौथ्यांदा न्यायालयात हजर राहण्यासाठी सुलतानपूरला जात असताना ताफ्यातील वाहनांच्या धडकेची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ परिस्थिती निर्माण झाली असली, तरी राहुल गांधी सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.आता सुलतानपूर न्यायालय या मानहानीच्या प्रकरणात काय निर्णय देते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती