उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडीमुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रिक्षेत बाळाला जन्म द्यावा लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला. यावेळी पोलिस शिपाई सतीश करले यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने डॉक्टरांना पाचारण केले. डॉ. शुभम साळवे यांनी वेळेत वैद्यकीय मदत दिल्याने माता आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
वाहतूककोंडीत अडकली रिक्षा; प्रसूतीवेदना असह्य
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एका गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्याने तिला रिक्षातून उल्हासनगर-३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील वाहतूककोंडीमुळे रिक्षा रुग्णालयापर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही. दरम्यान, महिलेच्या प्रसूतीवेदना वाढल्या आणि रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रिक्षेत तिची प्रसूती झाली.
पोलिस शिपाई धावले मदतीला
विष्णूनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सतीश करले हे रुग्णालयात सुरक्षेसाठी तैनात होते. रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या रिक्षातून त्यांना महिलेच्या वेदनांनी विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने रिक्षाजवळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून मदत मागवली.
डॉक्टरांनी तत्काळ दिली वैद्यकीय मदत
प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली होती आणि बाळाचा काही भाग बाहेर आला होता. अशा नाजूक परिस्थितीत डॉ. शुभम साळवे यांनी क्षणाचाही विलंब न करता रिक्षाजवळ पोहोचून आवश्यक वैद्यकीय मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे प्रसूती सुरक्षितपणे पार पडण्यास मदत झाली. त्यानंतर माता आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार देण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
उल्हासनगरमधील या घटनेमुळे शहरातील वाढत्या वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रस्त्यांवरील वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय गाठणेही कठीण होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः रुग्णवाहिका, गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांसाठी वाहतूककोंडी धोकादायक ठरू शकते.
या प्रसंगी पोलिस शिपाई सतीश करले यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि डॉ. शुभम साळवे यांनी केलेली तातडीची वैद्यकीय मदत यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या तत्परतेमुळे संकटाच्या क्षणी माता आणि नवजात बाळाला वेळेवर मदत मिळाली.