सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!१ नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी; कारसाठी ताशी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी वेगमर्यादा
  • पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
  • पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप
 शहर

जीविधाच्या पर्यावरण व्याख्यानमालेस प्रारंभ ;पहिल्या दिवशी 'कीटक व आपण’ विषयावर मार्गदर्शन

डिजिटल पुणे    27-10-2026 10:57:12

पुणे : जीविधा संस्थेतर्फे आयोजित १६ व्या पर्यावरण व्याख्यानमालेची सुरुवात सोमवार, दि.२६ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात झाली. ‘शोधयात्रा – युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास’ या संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी कीटक अभ्यासक ईशान पहाडे यांनी ‘कीटक व आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. 'जीविधा' चे राजीव पंडित, वृंदा पंडित यांनी स्वागत केले.उषःप्रभा पागे,वामन जोगळेकर,अनुपमा जुवेकर वासुदेव तांबोळी तसेच पर्यावरणप्रेमी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.जीविधाच्या या व्याख्यानमालेत मंगळवार,दि. २७ ऑक्टोबर रोजी मिहीर जोशी ‘विंचू आणि विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ही व्याख्यानमाला ३० ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे होणार आहे. ही व्याख्यानमाला निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींसाठी विनामूल्य खुली आहे.

पहिल्या दिवशीच्या व्याख्यानात ईशान पहाडे यांनी कीटकांची वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना, त्यांची संवेदनाक्षमता, वर्तन आणि पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका यांविषयी रंजक माहिती दिली.कीटकांची ओळख करून देताना त्यांनी त्यांच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन प्रमुख भाग असल्याचे सांगितले. कीटकांना सहा पाय असतात. त्यांच्या जीवनचक्रातील वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शरीररचनेत बदल होतात. प्रत्येक कीटकाची रचना, सवयी आणि वर्तन वेगवेगळे असते. काठीकीटक (Stick Insect), काजवे आणि सिकाडा यांसारख्या कीटकांची उदाहरणे देऊन त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.कीटकांच्या शरीररचनेपासून ते त्यांच्या सामाजिक वर्तनापर्यंत आणि पर्यावरणातील योगदानापर्यंत अनेक पैलूंची माहिती या व्याख्यानातून मिळाली. कीटक हे केवळ छोटे जीव नसून निसर्गातील अन्नसाखळी, विघटन प्रक्रिया आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत, हा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.  

कीटकांची दृष्टी आणि संवेदनाक्षमता

कीटकांचे जग मानवाच्या कल्पनेपेक्षाही अधिक अद्भुत आहे. सर्व कीटकांना मानवाप्रमाणे सर्व रंग दिसत नाहीत. त्यांच्या प्रजातीनुसार रंग ओळखण्याची क्षमता वेगवेगळी असते. काही कीटकांच्या संयुक्त डोळ्यांमध्ये अनेक दृश्य घटक असतात. त्यांच्या शरीरावरील विविध अवयवांचा उपयोग परिसरातील बदल ओळखणे, अन्न शोधणे आणि जोडीदारापर्यंत पोहोचणे यासाठी होतो. काही कीटकांमध्ये दिशाज्ञानासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासारख्या संकेतांचा वापर करण्याची क्षमताही आढळते.मधमाश्या आणि मुंग्या या कीटकांमध्ये दिसणारे सांघिक कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मधमाश्या अन्नाचा स्रोत कुठे आहे, त्या ठिकाणी पोहोचण्याची दिशा कोणती आणि अन्न किती उपलब्ध आहे, यासंबंधीची माहिती इतर मधमाश्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे नृत्य करतात. या संवादामुळे समूहातील इतर मधमाश्यांना अन्नाच्या ठिकाणाचा शोध घेण्यास मदत होते. मुंग्याही एकत्रितपणे काम करून अन्न गोळा करणे, घरटे बांधणे आणि वसाहतीचे संरक्षण करणे अशी कामे करतात. या उदाहरणांतून कीटकांमधील संवाद, नियोजन आणि सहकार्याची वैशिष्ट्ये समोर येतात.

मधमाश्या पोळ्यातील कप्पे षटकोनी आकारात तयार करतात. या रचनेमुळे कमी जागेत अधिक कप्पे तयार करता येतात आणि उपलब्ध मेणाचा कार्यक्षम वापर होतो. पोळ्याची रचना ही निसर्गातील कार्यक्षम अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे. कीटकांच्या अशा वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यास निसर्गातील रचनांमागील शास्त्रीय कारणे समजण्यास मदत होते.

काजवे, सिकाडा आणि कीटकांचे पर्यावरणातील योगदान

सिकाडामध्ये नर विशिष्ट आवाज काढून मादीला आकर्षित करतात. काजवेही प्रकाशाच्या संकेतांचा वापर जोडीदार शोधण्यासाठी करतात. मात्र, काजवे पाहण्यासाठी त्यांच्या अधिवासात जाताना जमिनीवर असलेल्या काजव्यांना पायाखाली तुडवले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या संख्येवर आणि प्रजननावर परिणाम होऊ शकतो. काजव्यांचे निरीक्षण करताना त्यांच्या अधिवासाची काळजी घेणे आवश्यक आहे.कीटक हे पर्यावरणातील विघटन प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावतात. एखादा प्राणी किंवा मनुष्य मृत झाल्यानंतर विविध कीटक आणि त्यांचे अळ्यांचे टप्पे मृत शरीराच्या विघटन प्रक्रियेत सहभागी होतात. या प्रक्रियेमुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन ते पुन्हा पर्यावरणात मिसळण्यास मदत होते. याशिवाय, मृत शरीरावर आढळणाऱ्या कीटकांच्या प्रजाती, त्यांच्या जीवनचक्राच्या अवस्था आणि विकासाचा अभ्यास करून मृत्यूला किती वेळ झाला असावा, याचा अंदाज न्यायवैद्यक कीटकशास्त्रात (Forensic Entomology) घेतला जातो.


 Give Feedback



 जाहिराती