जळगाव : घरात लेकीच्या साखरपुड्याची तयारी, कुटुंबात आनंदाचे वातावरण आणि मुलीच्या नव्या आयुष्याची स्वप्ने... मात्र, नियतीच्या एका भीषण आघाताने पाटील कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावून घेतला. शेतात काम करत असताना विजेच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील सुसरी गावाच्या शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरिता अशोक पाटील (वय ४३) यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. काही दिवसांवर आलेल्या या आनंदसोहळ्यापूर्वीच आई-वडिलांची साथ कायमची सुटल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतात काम करताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि सरिता पाटील हे मजुरांसह सुसरी गावच्या शिवारातील गट क्रमांक १२८/१ मधील स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतात कांद्याची लागवड करण्यात आली असून, तेथे निंदणी आणि खुरपणीचे काम सुरू होते.
याचवेळी शेतातील विद्युत खांबावरील एक तार तुटून गवतात पडलेली होती. काम करत असताना या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अशोक पाटील यांना विजेचा जोरदार धक्का बसला. पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात सरिता पाटील त्यांच्याजवळ गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. त्यामुळे दोघेही गंभीर अवस्थेत कोसळले.
रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोघांनाही उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे.
१ नोव्हेंबरला होणार होता लेकीचा साखरपुडा
अशोक आणि सरिता पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा १ नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मुलीच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात आनंदाने साजरी करण्यासाठी आई-वडील तयारीत असतील. मात्र, साखरपुड्याच्या अवघ्या काही दिवस आधीच दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आनंद दुःखात बदलला.
लेकीच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवण्यासाठी आणि तिच्या सुखी संसाराची स्वप्ने साकार होताना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या आई-वडिलांची साथ अचानक तुटली. मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि आई असा परिवार आहे. कुटुंबातील दोन्ही आधारवड हरपल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची वरणगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. विद्युत तार नेमकी कोणत्या कारणामुळे तुटून खाली पडली, याचा शोध घेतला जात आहे.लेकीच्या साखरपुड्याच्या उंबरठ्यावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सुसरी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.