सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
  • अखेर हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
  • पुण्यात मतमोजणी केंद्रावर महायुती-मविआचे कार्यकर्ते आमनेसामने; जेवणाच्या ट्रकवरून गोंधळ, मतपेट्यांच्या सीलवरही आक्षेप!
  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!१ नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी; कारसाठी ताशी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी वेगमर्यादा
  • पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
  • पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप
 शहर

पुण्यात मतमोजणी केंद्रावर महायुती-मविआचे कार्यकर्ते आमनेसामने; जेवणाच्या ट्रकवरून गोंधळ, मतपेट्यांच्या सीलवरही आक्षेप!

डिजिटल पुणे    27-10-2026 16:25:52

पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच पुण्यातील बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जेवणाचे बॉक्स आत नेण्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच काही मतपेट्यांच्या सीलबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्याने केंद्रावरील तणावात भर पडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

जेवणाचा ट्रक आत आल्याने कार्यकर्त्यांचा संताप

पुण्यातील बालेवाडी स्टेडियम परिसरात विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी केंद्रात प्रवेश देताना पोलिसांकडून कडक तपासणी केली जात आहे. पेन, कागद, डायरी, घड्याळ आणि वाहनांच्या चाव्या यांसारख्या वस्तू आत नेण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, याच दरम्यान जेवणाचे पॅकिंग असलेला एक ट्रक मतमोजणी केंद्राच्या परिसरात आल्याने वादाला सुरुवात झाली. इतर वस्तू आत नेण्यास परवानगी नसताना जेवणाचा ट्रक आत कसा आला, असा सवाल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. यावरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.जेवणाचे बॉक्स घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पेन, डायरी आणि चाव्यांवरूनही नाराजी

मतमोजणी केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेवरूनही काही उमेदवारांचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पेन, कागद, डायरी, घड्याळ तसेच वाहनांच्या चाव्या आत नेण्यास मज्जाव केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी केली जात असताना काही वस्तूंवर निर्बंध आणि दुसरीकडे जेवणाचा ट्रक आल्याने नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकारामुळे मतमोजणी केंद्रावरील वातावरण काही काळ तापले होते.

 

मतपेट्यांच्या सीलबाबतही आक्षेप

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांच्या प्रतिनिधींनी काही मतपेट्यांच्या सीलबाबत आक्षेप नोंदवल्याची माहिती आहे.काही मतपेट्यांच्या सील केलेल्या तारा तुटलेल्या असल्याचे, तसेच काही ठिकाणी लाखेचे सील नसल्याचे प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिल्याचा दावा करण्यात आला. या प्रकारावर त्यांनी हरकत घेत संबंधित मतपेट्या बाजूला ठेवून सील व्यवस्थित असलेल्या मतपेट्यांची आधी मोजणी करण्याची मागणी केली.या आक्षेपांवर निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ दाखवण्यात येईल, असे सांगण्यात आल्याची माहिती आहे. मतपेट्यांच्या सीलबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराचाही आक्षेप

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या मतमोजणी प्रक्रियेवर इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत दिनकर आसगावकर यांनीदेखील विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदवल्याचे सांगण्यात येत आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांवर हरकती घेतल्या जात असल्याने संपूर्ण प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जेवणाच्या ट्रकवरून झालेला वाद, सुरक्षा नियमांबाबतची नाराजी आणि मतपेट्यांच्या सीलबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न यामुळे पुण्यातील मतमोजणी केंद्रावरील वातावरण चर्चेचा विषय ठरले आहे.पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली. दरम्यान, मतपेट्यांच्या सीलबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर आणि नोंदवलेल्या आक्षेपांवर अधिकृत तपशील समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती