सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
  • मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात चौकशीनंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडली भूमिका
  • तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
  • राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
  • शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
 क्राईम

विरारमध्ये बंद फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ, मृत्यूचे गूढ कायम

डिजिटल पुणे    29-10-2026 15:50:18

विरार : विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुमार मनसुखलाल मेहता (वय ५०), दिपेश मनसुखलाल मेहता (वय ५२) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. तिघांनी विषप्राशन केले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या तिघांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुर्गंधीमुळे घटना उघडकीस

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी येथील गार्डन अॅव्हेन्यू इमारतीच्या डी विंगमधील के-३-डी, फ्लॅट क्रमांक १२०३ मध्ये ही घटना घडली. संबंधित फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे इमारतीतील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या सचिवांना याबाबत माहिती दिली. सचिवांकडून पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर बोळींज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता आत तिन्ही भावंडांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आर्थिक अडचणी आणि आजारपणाची चर्चा

प्राथमिक माहितीनुसार, मृतांपैकी एक जण कर्करोगाने ग्रस्त होता. तसेच हे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तिघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक संशय असून, मृत्यूचे कारण आणि त्यामागील परिस्थिती तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही फ्लॅटची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोळींज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

एका वर्षात तिसरी घटना

दरम्यान, याच इमारतीत एका वर्षाच्या कालावधीत आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याआधी दहावीच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले होते.

एकाच इमारतीत वारंवार अशा घटना घडत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मेहता कुटुंबातील तिन्ही भावंडांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा उलगडा आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती