सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
  • मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात चौकशीनंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडली भूमिका
  • तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं
  • राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
  • शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
 जिल्हा

शिवसेनेनं युतीधर्म पाळलाच! भाजपच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावरही केलं मोठं भाष्य

डिजिटल पुणे    29-10-2026 17:13:30

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने नेहमीच युतीधर्माचे पालन केले असून, युतीधर्म पाळण्याची पक्षाची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं उत्तर

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आला होता. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बाजू स्पष्ट केली. शिवसेना आणि भाजपची युती चार ठिकाणी होती. पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आणि भाजपचा उमेदवार यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यामुळे शिवसेनेने युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. युतीतील सहकार्याची भूमिका शिवसेनेने नेहमीच जपली असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.

मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिला; शिंदेंनी सांगितलं कारण

मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मीनाक्षीताई शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे पाठवला आहे. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. मात्र, या घटनेवरून काही राजकीय पक्षांकडून राजकारण केले जात असल्याची भावना मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाशी वारंवार आपले नाव जोडले जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पदाचा राजीनामा दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष करा; पोलिसांना स्पष्ट सूचना

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच आपण पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यास सांगितले होते. आरोपींना लवकर पकडण्यात आले असून शस्त्रही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये आणि सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात न्याय्य चौकशी होण्याची गरज अधोरेखित केली.

ठाण्यातील जाळपोळ आणि दगडफेकीवरून शिंदेंची नाराजी

पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात घडलेल्या घटनांवरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. ठाण्याबाहेरील काही लोकांकडून ठाणेकरांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अलीकडेच रात्रीच्या वेळी जाळपोळ, महामार्ग बंद करणे, पोलिसांवर दगडफेक आणि सोड्याच्या बाटल्या फेकण्यासारखे प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

एका दुःखद घटनेचा आधार घेऊन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होणे दुर्दैवी असल्याचे शिंदे म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टीकेला घाबरत नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

 

स्वतःवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. आपल्यावर सातत्याने टीका केली जात असली, तरी त्याची आपण पर्वा करत नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांना प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेच दिसतात, असा टोलाही त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील धनाजी-संताजींचा दाखला देत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आपण काय काम करतो, हे जनतेला माहीत असल्याचेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने कर्जवसुली केल्यास कठोर कारवाई

दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या आणि सावकारांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. कर्जाच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

बँका, सावकार आणि मायक्रोफायनान्स संस्थांनी शेतकऱ्यांवर सक्तीने कर्जवसुली करू नये. शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

एकीकडे विधानपरिषद निवडणुकीनंतर युतीधर्मावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, दुसरीकडे मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावरील वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती