सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
  • महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
  • ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
  • बद्रीनाथहून परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जोशीमठजवळ कोसळले, पायलटसह सहा जणांचा मृत्यू
  • मिनाक्षी शिंदेंना दुहेरी धक्का, आधी राजीनामा द्यावा लागला, नंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी साथही सोडली, टेंभी नाक्यावर कोणीच फिरकलं नाही
  • पुण्यातील सारसबागेसमोर खळबळजनक घटना; 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
 राज्य

बद्रीनाथहून परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जोशीमठजवळ कोसळले, पायलटसह सहा जणांचा मृत्यू

डिजिटल पुणे    30-10-2026 17:21:11

उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. बद्रीनाथ धाम येथून प्रवाशांना घेऊन डेहराडूनच्या दिशेने निघालेले ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले. या भीषण दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित हेलिकॉप्टरने बद्रीनाथ धाम येथून दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी उड्डाण केले होते. ते डेहराडूनमधील सहस्रधारा येथे जात होते. मात्र, जोशीमठ परिसरातील चाई गावाजवळ असलेल्या लष्करी छावणीच्या परिसरात हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. त्यानंतर हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली.

या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण सहा जण प्रवास करत होते. त्यामध्ये पाच प्रवासी आणि एका वैमानिकाचा समावेश होता. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयटीबीपीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यानंतर या दुर्घटनेत सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

खराब हवामानामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

अपघाताच्या वेळी संबंधित परिसरात पाऊस, धुके आणि कमी दृश्यमानतेची परिस्थिती होती. हवामान विभागाने ३० ऑक्टोबर रोजी चमोलीसह नैनीताल, चंपावत, पिथौरागढ आणि बागेश्वर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती आणि परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून दुःख व्यक्त

या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत प्रशासन आणि बचाव यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण घटनेवर आपण लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघातांची मालिका

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर उड्डाण करताना बदलते हवामान, धुके, कमी दृश्यमानता आणि अरुंद दऱ्या ही मोठी आव्हाने ठरतात. यापूर्वी मे २०२५ मध्ये गंगोत्री मार्गावरील गंगनानीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जून २०२५ मध्ये केदारनाथजवळ झालेल्या अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागले होते.आता बद्रीनाथहून परतणाऱ्या हेलिकॉप्टरला झालेल्या या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा उत्तराखंडमधील हेलिकॉप्टर प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती