पिंपरी-चिंचवड : संकटाच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या 20 वर्षीय आर्या कांबळे हिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथील कुणाल मार्केट परिसरातील एका सोसायटीत मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत आर्याने प्रसंगावधान दाखवत तब्बल 70 ते 80 रहिवाशांचे प्राण वाचवले. तिच्या या धाडसी कामगिरीची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली असून, पत्र पाठवून तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
मध्यरात्री आग लागली, आर्याने दाखवले प्रसंगावधान
मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण स्वरूप धारण केले. पार्किंगमधील वाहनांना आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. त्यावेळी इमारतीतील सुमारे 70 ते 80 रहिवासी गाढ झोपेत होते. आगीचा धोका वाढत असताना आर्या कांबळे हिने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले.
घराच्या प्रवेशद्वारापर्यंत धूर आणि ज्वाळा पोहोचल्यामुळे बाहेर पडणे कठीण झाले होते. अशा वेळी आर्याने अग्निशमन दलाला संपर्क साधला. त्यानंतर वडिलांचा विरोध असूनही तिने पहिल्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. या प्रयत्नात तिच्या पायाला दुखापत झाली. मात्र, वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने इतर रहिवाशांना जागे करण्यास सुरुवात केली.
जखमी अवस्थेतही रहिवाशांना केले सावध
आर्याने सोसायटीतील नागरिकांना तातडीने घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी, तसेच टेरेसवर जाण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येकजण सुरक्षित बाहेर पडला आहे की नाही, याचीही तिने खात्री केली. तिच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत पार्किंगमधील 17 दुचाकी आणि 4 चारचाकी अशा एकूण 21 वाहनांचे आगीत मोठे नुकसान झाले. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रातून केले कौतुक
आर्याच्या या धाडसाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तिचे अभिनंदन केले. संकटाच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवण्यासाठी तिने घेतलेली झेप अतुलनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.
'ज्या धीरोदात्तपणे आणि प्रसंगावधान राखून तू अनेकांचे जीव वाचवलेस, त्या साहसाला तोड नाही. पायाला दुखापत होऊनही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी केलेली तुझी धडपड हे मोठे साहस आहे,' अशा शब्दांत फडणवीस यांनी आर्याचे कौतुक केले.तसेच, मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते; मात्र माणसांचे प्राण अनमोल असतात. आर्याच्या धाडसामुळे अनेक कुटुंबांचे आणि त्यांच्या जीवलगांचे रक्षण झाले, असेही त्यांनी नमूद केले. मराठी मातीतील रणरागिणींची परंपरा पुढे नेणारी आर्या असल्याचा अभिमान व्यक्त करत तिच्या कार्याला तमाम महाराष्ट्राच्या वतीने सलाम केला.
महापालिकेकडूनही आर्याचा गौरव
मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप मिळण्यासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही आर्या कांबळे हिच्या शौर्याचा गौरव केला आहे. संकटाच्या प्रसंगी दाखवलेले धैर्य, तत्परता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव यामुळे आर्याने अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, एका 20 वर्षीय तरुणीने दाखवलेल्या या धाडसामुळे अनेक कुटुंबांना नवजीवन मिळाले आहे.