सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 शहर

पुणेकरांनो, थंडीचा मुक्काम लांबणीवर! ‘अर्णव’ चक्रीवादळामुळे तापमानात वाढ; २ नोव्हेंबरनंतर गारव्याची चाहूल

डिजिटल पुणे    31-10-2026 11:40:32

पुणे : ऑक्टोबर महिना संपत आला असला, तरी पुणेकरांना अद्याप थंडीचा अनुभव घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सकाळी आणि रात्री जाणवणारा अपेक्षित गारवा अद्याप निर्माण झालेला नाही. उलट दिवसभराचा उकाडा, हवेत वाढलेली आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णव’ चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला असून, पुण्यातील तापमानातही बदल पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी दिवसभर शहरात उष्ण आणि दमट वातावरण होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पुण्याच्या काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे ढगाळ स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, रात्रीच्या तापमानात अपेक्षित घट होत नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे पुणे येथील वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आणि मध्यावर पुण्याचे किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे यंदा लवकर थंडी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे हवामानाचे गणित बदलले.

हवेतील आर्द्रता वाढल्याने ढगाळ वातावरण तयार झाले. अशा परिस्थितीत रात्री जमिनीतील उष्णता बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आणि थंडीचा प्रभाव कमी झाला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यात ढगाळ आणि दमट वातावरण कायम राहू शकते. मात्र, त्यानंतर २ नोव्हेंबरपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सकाळी आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे पुणेकरांना थंडीचा अनुभव घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

ऋतुचक्र बदलल्याची चर्चा चुकीची

बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्र पूर्णपणे बदलले असल्याची चर्चा सध्या होत आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात तापमानात चढ-उतार होणे ही नवीन किंवा असामान्य घटना नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.डॉ. सानप यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या ५० ते ८० वर्षांतील हवामानाच्या नोंदी पाहिल्यास ऑक्टोबर महिन्यात अशाच प्रकारचे बदल यापूर्वीही झाल्याचे दिसून येते. चक्रीवादळांचा प्रभाव, आर्द्रतेतील वाढ आणि ढगाळ वातावरण यामुळे तापमानात बदल होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ऋतुचक्र पूर्णपणे बदलले आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

थंडीची सुरुवात होण्यासाठी केवळ एक-दोन दिवस तापमान कमी होणे पुरेसे नसते. उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे, हवेत कमी आर्द्रता तसेच किमान तापमानात सलग घट होणे आवश्यक असते. सध्या पुण्यात अशी अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवामानात बदल होण्याची शक्यता असल्याने पुणेकरांना लवकरच थंडीची चाहूल लागण्याची अपेक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती