सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 विश्लेषण

उद्घाटनाआधीच मान मेट्रो स्टेशनला पावसाच्या पाण्याची गळती; बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, पुणेकरांमध्ये संताप!

डिजिटल पुणे    02-11-2026 13:10:48

पुणे : पुणेकरांची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाच्या लोकार्पणापूर्वीच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचे पाणी गळू लागल्याने मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. येत्या ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे लोकार्पण होणार असतानाच हा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कामकाजावर टीका सुरू झाली आहे.

रविवारी हिंजवडी आणि मान परिसरात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मान मेट्रो स्टेशनला बसला. पावसाचे पाणी स्टेशनच्या छतामधून आत झिरपून प्लॅटफॉर्म तसेच प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या परिसरात साचल्याचे समोर आले आहे. पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांना बादल्या आणि वायपरच्या मदतीने ते बाहेर काढावे लागले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग हा पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. हजारो कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम पीएमआरडीए आणि टाटा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र, प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वीच स्टेशनमध्ये पाण्याची गळती सुरू झाल्याने बांधकामाची गुणवत्ता आणि कामाच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, पीएमआरडीए प्रशासनाकडून मेट्रोच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. ३ नोव्हेंबर रोजी बालेवाडी क्रीडा संकुलात मुख्य कार्यक्रम होणार असून, ४ नोव्हेंबरपासून मार्गावरील २३ पैकी १७ स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. पर्यावरणपूरक सुविधा, सौरऊर्जा यंत्रणा आणि महिला लोको पायलट अशा वैशिष्ट्यांचाही प्रशासनाकडून उल्लेख करण्यात आला होता.

मात्र, प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होण्याआधीच पावसामुळे स्थानकात गळती झाल्याने या प्रकल्पाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मेट्रो स्थानकांमध्ये विद्युत यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने आणि विविध स्वयंचलित उपकरणे असतात. अशा ठिकाणी पाणी गळती होत असल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उद्घाटनापूर्वी गळती रोखणार का?

मेट्रोचे उद्घाटन निश्चित वेळेत करण्याच्या घाईत कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मान मेट्रो स्टेशनमधील पाणीगळतीची तातडीने दुरुस्ती करावी, संपूर्ण स्थानकाची तपासणी करावी आणि बांधकामाच्या दर्जाबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुणेकरांना आधुनिक आणि सुरक्षित मेट्रो सेवा देण्याचा दावा करणाऱ्या प्रशासनासमोर आता उद्घाटनापूर्वीच निर्माण झालेल्या या समस्येचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे लोकार्पणापूर्वी ही गळती थांबवून प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री प्रशासन कशी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती