सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 जिल्हा

भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून ७० ते १०० जणांना विषबाधा; वधू-वरासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल

डिजिटल पुणे    02-11-2026 15:27:16

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरात लग्नसमारंभातील जेवणामुळे अनेकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अंदाजे ७० ते १०० जणांना त्रास झाल्याचा संशय असून, त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विषबाधितांमध्ये वधू-वरासह लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास ४०० ते ५०० नागरिक उपस्थित होते. लग्नसमारंभात जेवणाच्या शेवटच्या पंगतीत भोजन केलेल्या काही नागरिकांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

'खरवस' खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याचा संशय

लग्नसमारंभात जेवणासोबत देण्यात आलेला खरवस खाल्ल्यानंतर काही जणांना त्रास सुरू झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विविध रुग्णालयांत उपचार सुरू

या घटनेतील बाधितांपैकी २२ जणांना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात, चार लहान मुलांना कामगार रुग्णालयात, तर पाच जणांना विक्रोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर बाधितांनाही आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.

दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेल्या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, अन्नातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याबाबत तपास आणि आवश्यक कार्यवाही सुरू आहे.या घटनेमुळे भांडुप आणि नाहूर परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, लग्नसमारंभातील अन्नाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे


 Give Feedback



 जाहिराती