पुणे : कल्याणी नगर मधील 'वेलेन्सिया' या प्रकल्पामध्ये मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त मजले व वाढीव बांधकाम केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तसेच ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड चे प्रदेशाध्यक्ष सनी निम्हण यांनी महापालिका आयुक्तांना तक्रार अर्ज देऊन केली असून तातडीने स्थळ पाहणी आणि अधिकृत संयुक्त मोजणी करण्याची मागणी केली आहे.आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही माहिती दिली आहे.
निम्हण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,सर्व्हे नं. २१३, २१४, २१५/२, सी. एस. नं. २१११, फायनल प्लॉट नं. १८, ५७, येथील प्रकल्पाला झोन क्र. ४ कार्यालयाने १९/१०/२०२२ रोजी बांधकाम थांबविण्याचे पत्र दिले होते. तरीही मंजूर नकाशातील मजल्यांची संख्या, मजलानिहाय क्षेत्रफळ, एकूण बांधकाम क्षेत्र,एफ एस आय, टी डी आर,, पार्किंग, रेफ्युज एरिया, आणि साईड मार्जिन मध्ये प्रत्यक्ष जागेवर मोठी तफावत असल्याचा संशय सनी निम्हण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. पालिकेला दिलेला अर्ज कोणत्याही वैयक्तिक वादातून नसून सार्वजनिक हित आणि बांधकाम नियमांचे पालन व्हावे यासाठी केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या तक्रारीची दखल घेत पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग क्र. ४ ने संबंधित मालक/विकासक पंकज जतकर यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६० (१ अ) अन्वये दि. २२/१०/२०२६ रोजी नोटीस बजावली आहे. सातव्या मजल्यावर विनापरवाना बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने परवानगी घेतली आहे का, याचा खुलासा १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, तक्रारदाराने मंजूर पार्किंगच्या जागेत बांधकाम झाले असल्यास ते हटवणे, स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट व फायर सेफ्टी तपासणी करणे, अनधिकृत बांधकाम आढळल्यास कलम ५३ व २६० अंतर्गत नोटीस बजावून ते पाडणे आणि संबंधित वास्तुविशारद व अभियंत्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवणे, तसेच कारवाई होईपर्यंत पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशा १७ मागण्या केल्या आहेत.