मुंबई : पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आणि ग्रामीण पशुवैद्यकीय आरोग्यसेवेला बळकटी देणारा आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांमध्ये सेवा देण्यासाठी त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल, असे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आभार मानले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आंतर्वासिता निर्वाह भत्यात सात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सालयात एक वर्षासाठी आंतर्वासिता पशुवैद्यक म्हणून काम करणे अनिवार्य असते. या कालावधीत त्यांच्या निवास, भोजन आणि प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चापोटी ११ हजार रुपये दिले जात असत. पण आता त्यांना दरमहा १८ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी १५ हजार रुपये राज्य शासन देणार आहे. उर्वरित तीन हजार रुपये भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या निधीमधून देण्यात येणार आहे. अनुसंधान परिषद केवळ सहा महिन्यासाठी निधी देते. त्यापुढील सहा महिन्याचा निधी देण्यासाठी विद्यापीठाच्या स्वनिधीमधून खर्च करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.
पशुपालकांना दर्जेदार सेवा मिळेल
या निर्णयावर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील पशुधनाचे आरोग्य जपणे, पशुपालकांना दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील पशुचिकित्सा यंत्रणा अधिक सक्षम करणे, हे शासनाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. या उद्देशाने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुवैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभव मिळणे अत्यंत महत्वाचे असते. या कालावधीत विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांमध्ये काम करण्याची, पशुधनाच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेण्याची तसेच प्रत्यक्ष पशुचिकित्सा सेवेत सहभागी होण्याची संधी मिळते. या विद्यार्थ्यांच्या कामाचे महत्व आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, या निर्णयामुळे पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळण्याबरोबरच ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुचिकित्सालयांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यास या निर्णयाचा हातभार लागेल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, त्यांच्या कौशल्यात वाढ होईल आणि भविष्यात सक्षम पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी त्यांची तयारी अधिक चांगल्या प्रकारे होईल.
राज्य शासनाचा हा निर्णय केवळ विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्यापुरता मर्यादित नसून, राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, ग्रामीण भागाला सक्षम पशुवैद्यकीय मनुष्यबळ आणि शेतकरी-पशुपालकांना अधिक चांगल्या सेवा, असा या निर्णयाचा व्यापक उद्देश आहे. राज्यातील पशुधनाचे संवर्धन आणि पशुपालकांचे आर्थिक हित जपण्यासाठी शासन यापुढेही आवश्यक त्या उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.