सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप
  • 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
 शहर

विशेष मुलांच्या सन्मानपूर्ण, स्वावलंबी आणि सक्षम भविष्यासाठी ‘बी.जी. सर फाउंडेशन’चा शुभारंभ

डिजिटल पुणे    05-11-2026 15:39:05

पुणे : विशेष गरजा असलेल्या मुलांमधील सुप्त गुण, क्षमता आणि कौशल्ये ओळखून त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि आधार देत स्वावलंबी व सन्मानपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने बी.जी. सर फाउंडेशन (B.G. Sir Foundation) या संस्थेचा शुभारंभ पुणे येथे रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे उद्घाटन आदरणीय श्री. बालकृष्ण गोपाळराव कुलकर्णी सर (बी.जी. सर) यांच्या हस्ते करण्यात आले.या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

यामध्ये ह.भ.प. श्री. यशोधन महाराज साखरे (साधक आश्रम, आळंदी), श्री. ज्ञानेश्वर तापकीर (संस्थापक, योगीराज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बाणेर), श्री. राजकिशोर मोदी (अध्यक्ष, अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक), श्री. गणेश शिरसाठ (संस्थापक, शिरसाठ अकादमी), श्री. सचिन बढे (पोलीस उपायुक्त,मोटार परिवहन,बृहन्मुंबई) आणि श्री. राम लिपटे (उप धर्मादाय आयुक्त) डाॅ.अनुप वर्मा ( बालमेंदूरोग तज्ञ ) यांची उपस्थिती लाभली.

संस्थेचे ध्येय व कार्य :

प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष क्षमता असते. त्या क्षमतांना योग्य दिशा, संधी आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून बी.जी. सर फाउंडेशन विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सर्वसमावेशक, संवेदनशील आणि सहकार्यशील समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

संस्थेमार्फत विशेष मुलांसाठी लवकर निदान, योग्य उपचार व थेरपी, पुनर्वसन, सुलभ शिक्षण, सहाय्यक तंत्रज्ञान तसेच पालकांना मार्गदर्शन व कौटुंबिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर समाजामध्ये जनजागृती, स्वीकारार्हता आणि समान संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

संस्थेचे नेतृत्व व कार्यकारिणी :

संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ. सपना बढे, सचिव डॉ. विश्वनाथ बी. कुलकर्णी (बालरोग मेंदूविकार तज्ज्ञ), खजिनदार श्री. दत्तात्रय गंगणे तसेच विश्वस्त श्री. आशिष पद्मने, श्री. दीपक सरगड आणि सौ. कविता सरगड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य पुढे नेले जाणार आहे.विशेष मुलांना केवळ सहानुभूती नव्हे, तर सन्मान, संधी, योग्य उपचार आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास मिळावा, हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे.समाजातील प्रत्येक घटकाच्या सहकार्याने विशेष मुलांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बी.जी. सर फाउंडेशन कटिबद्ध आहे.बी.जी. सर फाउंडेशन Different Abilities, Infinite Possibilities वेगळ्या क्षमता, अनंत शक्यता!


 Give Feedback



 जाहिराती