नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील मयूर विहार फेज-२ परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा शाळेतील वर्गातच अचानक मृत्यू झाला. शिक्षिकेशी बोलत असताना प्रकृती बिघडून ती अचानक जमिनीवर कोसळली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पूर्व दिल्लीतील पांडव नगर येथील लव्हली हेरिटेज स्कूलमध्ये बुधवारी ही घटना घडली. संबंधित मुलगी तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. वर्गात अचानक बेशुद्ध पडल्याने शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.
या घटनेतील सर्वाधिक वेदनादायक बाब म्हणजे तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या दाम्पत्याच्या आयुष्यात मुलीचे आगमन झाले होते. अपत्यप्राप्तीसाठी आई-वडिलांनी अनेक उपचार घेतले, तसेच देवाकडे नवसही केले होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेली ही मुलगी संपूर्ण कुटुंबाचा आनंद होती. तिच्या अकाली जाण्याने आई-वडिलांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने स्वतःच्या करिअरकडेही पाठ फिरवली होती. लग्नानंतर बी.एड.चे शिक्षण पूर्ण करून शिक्षिका होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र मुलीच्या जन्मानंतर तिचे संगोपन आणि शिक्षण यालाच तिने प्राधान्य दिले. मुलीच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देत तिचे भविष्य घडवण्यासाठी आईने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या.
मुलीचे वडील मौलाना आझाद रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतात. याशिवाय संध्याकाळी ते जिममध्ये प्रशिक्षणही देतात. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही मुलीला उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मुलीला बॅडमिंटन खेळण्याची विशेष आवड होती. ती अनेकदा वडील आणि काकांसोबत बॅडमिंटन खेळायची. वडील जिममध्ये जात असतानाही ती त्यांच्यासोबत जायची.
बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वडिलांनी मुलीला नेहमीप्रमाणे शाळेत सोडले होते. मात्र सकाळी दहाच्या सुमारास शाळेतून तिची प्रकृती अचानक बिघडल्याचा फोन कुटुंबीयांना आला. ही माहिती मिळताच घरी असलेल्या आईने तातडीने शाळेकडे धाव घेतली. मात्र तिथे पोहोचल्यानंतर मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. दुःख अनावर झाल्याने त्यांची प्रकृतीही खालावली आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिक्षिकेने सांगितला घटनेचा घटनाक्रम
शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी खेळून वर्गात परतली होती. त्यावेळी ती खूप थकलेली दिसत होती. शिक्षिकेशी काहीतरी बोलत असतानाच अचानक ती जमिनीवर कोसळली. तिला तातडीने उचलून खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ती बेशुद्धावस्थेत होती. जमिनीवर पडल्यामुळे तिच्या हनुवटीला दुखापत झाली आणि रक्तस्रावही सुरू झाला. त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मृत्यू नैसर्गिक असल्याचे संकेत मिळाले असले, तरी पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात आलेला आनंदाचा दिवा अवघ्या नऊ वर्षांत विझल्याने या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. एका क्षणात हसते-खेळते कुटुंब दुःखाच्या गर्तेत सापडले असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.