पुणे : धायरी आणि वडगाव परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन या रस्त्यावरील कालव्यावर पूल उभारणे तसेच नारायण सणस शाळा ते बारांगणी मळा या ९ मीटर रुंदीच्या डी.पी. रस्त्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागेचा वापर करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे धायरी परिसरातील बहुप्रतीक्षित रस्ते विकासाच्या कामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धायरी, वडगाव आणि परिसरातील नागरी वस्तीमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकसंख्या आणि वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने मुख्य रस्त्यांवर विशेषतः सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पर्यायी रस्ते आणि कालव्यावरील पुलाची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांनी या दोन्ही कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या कामांना जलसंपदा विभागाची तांत्रिक व प्रशासकीय परवानगी मिळावी, यासाठी आमदार तापकीर यांनी राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने विशेष विनंती केली होती. तसेच दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन रस्त्यावरील कालव्यावरील पूल आणि नारायण सणस शाळा ते बारांगणी मळा या ९ मीटर रुंदीच्या डी.पी. रस्त्यासाठी जलसंपदा विभागाच्या क्षेत्राचा वापर करण्यास आवश्यक परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
या प्रक्रियेत स्थानिक नगरसेवक हरिदास चरवड आणि राजाभाऊ लायगुडे यांनीही आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची भूमिका बजावली. संबंधित विभागातील अधिकारी, अभियंते आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधत प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात आले. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण कोल्हे, उपअभियंता सचिन गाडे तसेच पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुरेश संखे यांनीही या प्रस्तावाच्या कार्यवाहीसाठी तत्परतेने प्रयत्न केले.
पर्यायी रस्त्यामुळे वाहतुकीचा ताण होणार कमी
या मंजुरीमुळे लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन या मार्गावरील कालव्यावर पूल उभारण्यासंदर्भातील पुढील कार्यवाही करता येणार आहे. तसेच कालव्यालगत नारायण सणस शाळा ते बारांगणी मळा या ९ मीटर रुंदीच्या डी.पी. रस्त्याच्या विकासाचाही मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर धायरी मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात विभागला जाण्यास मदत होणार आहे. परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
विशेष म्हणजे, या पर्यायी मार्गाचा फायदा केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनाच नव्हे, तर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांनाही होणार आहे. वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होण्यासही या रस्त्यांचा उपयोग होऊ शकतो.
धायरीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला महत्त्वाची चालना
धायरी आणि वडगाव परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता रस्ते, पूल आणि पर्यायी वाहतूक मार्गांची उभारणी ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाने दिलेली मंजुरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता संबंधित विभाग आणि पुणे महानगरपालिकेने पुढील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती देणे अपेक्षित आहे.
आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धायरीतील नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
