नाशिक : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे उघडकीस आली आहे. आर्यन सोमनाथ कांबळे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आदित्य एकनाथ मोंढे (वय २०) याला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आदित्य मोंढे याच्या बहिणीसोबत आर्यनचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होता. याच रागातून आदित्यने आर्यनला भेटण्यासाठी सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्गावरील स्मशानभूमीजवळ बोलावून घेतले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले आणि संतापलेल्या आरोपीने धारदार चाकूने आर्यनवर हल्ला केला.
पोटावर, गळ्यावर, छातीवर आणि हातावर केले वार
आरोपीने आर्यनच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर तसेच हातावर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल; पोलिसांकडून पुढील तपास
या घटनेनंतर मृत आर्यनच्या नातेवाईकांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नातेवाईक रोशन पप्पू कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य मोंढे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
कौटुंबिक प्रतिष्ठेच्या कारणातून हा खून करण्यात आला की, यामागे अन्य काही कारणे आहेत, याचाही पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.