पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या या परीक्षांच्या तारखांची विद्यार्थी आणि पालक गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर शुक्रवारी (६ नोव्हेंबर) राज्य मंडळाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करत परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये लेखी परीक्षांसह प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
बारावीच्या परीक्षा ८ फेब्रुवारीपासून
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षांना ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून १८ मार्च २०२७ पर्यंत परीक्षा चालणार आहेत.
दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. तर लेखी परीक्षांना १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या परीक्षा १५ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहेत.
दहावी-बारावी परीक्षांचे महत्त्वाचे वेळापत्रक
इयत्ता बारावी (HSC)
- प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा : २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७
- लेखी परीक्षा : ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७
इयत्ता दहावी (SSC)
- प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा : २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७
- लेखी परीक्षा : १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७
अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध
विद्यार्थ्यांना परीक्षांचे विषयवार आणि दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. त्यासाठी "www.mahahsscboard.in" (http://www.mahahsscboard.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
दरम्यान, संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाकडून देण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानावे, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर प्रसारित होणाऱ्या अनधिकृत वेळापत्रकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध वेळेचा योग्य वापर करून परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी.
