सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात,
 शहर

पुणेकरांनो लक्ष द्या! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रो रात्री ८ नंतर बंद; तिन्ही मार्गांच्या वेळापत्रकात बदल

डिजिटल पुणे    07-11-2026 17:00:49

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या तिन्ही मार्गांवरील सेवांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी रात्री प्रवास करणाऱ्या पुणेकरांनी मेट्रोच्या सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.

महामेट्रोकडून संचालित मेट्रोच्या लाईन १ (स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड) आणि लाईन २ (वनाज ते रामवाडी) या दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा रविवारी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. नियमित दिवसांमध्ये या मार्गांवरील मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत धावत असते. मात्र, लक्ष्मीपूजनामुळे शेवटच्या फेऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

लाईन ३ च्या शेवटच्या फेऱ्यांच्या वेळेतही बदल

पुणे मेट्रोच्या लाईन ३ (मान ते जिल्हा न्यायालय) मार्गावरील प्रवाशांसाठीही महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, मान येथून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी रवाना होणार आहे. यापूर्वी ही सेवा रात्री १० वाजून ३० मिनिटांपर्यंत उपलब्ध होती.तर जिल्हा न्यायालय स्थानकातून मानच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. नियमित वेळापत्रकात ही फेरी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी होती. विशेष म्हणजे, लाईन १ आणि लाईन २ वरून लाईन ३ कडे जाणाऱ्या तसेच लाईन ३ वरून इतर मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जोडसेवेची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

९ नोव्हेंबरपासून मेट्रो पुन्हा नियमित वेळेत

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करण्यात आलेला हा बदल केवळ ८ नोव्हेंबरपुरता मर्यादित असणार आहे. सोमवार, ९ नोव्हेंबरपासून पुणे मेट्रोच्या तिन्ही मार्गांवरील सेवा पुन्हा पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू होतील. त्यानुसार, मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता, तर शेवटची फेरी रात्री ११ वाजता उपलब्ध असेल.

गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

दरम्यान, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांचे नियोजनही करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर कमी गर्दीच्या वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री मेट्रोने प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या प्रवाशांनी शेवटच्या फेऱ्यांच्या वेळा लक्षात घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.


 Give Feedback



 जाहिराती