मुंबई : मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीदरम्यान एका प्रवाशाला थेट धावत्या लोकलमधून बाहेर ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरवाजात उभे राहण्यावरून वादाला सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चर्चगेट-विरार फास्ट लोकल ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान असताना दरवाजाजवळ उभे राहण्याच्या कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोघांमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
दोन्ही प्रवाशांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू असतानाच त्यातील एका प्रवाशाला चालत्या लोकलमधून बाहेर फेकण्यात आल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मुंबई सेंट्रल स्थानकामुळे मोठा अनर्थ टळला
या घटनेदरम्यान लोकल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जात होती. त्यामुळे ट्रेनचा वेग तुलनेने कमी होता. याच कारणामुळे प्रवासी खाली पडूनही मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, धावत्या लोकलमधून प्रवाशाला बाहेर ढकलण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरवाजात उभे राहण्यासारख्या किरकोळ कारणावरून प्रवाशांमध्ये इतका मोठा वाद होऊन त्याचे रूपांतर थेट हिंसक प्रकारात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दी, धक्काबुक्की आणि किरकोळ कारणांवरून होणारे वाद यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार समोर येत आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.