पुणे : दिवाळीत फटाके वाजवण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान गंभीर हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठ परिसरात घडली आहे. रिक्षाचे चाक फटाक्यावरून गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून काही तरुणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या २१ वर्षीय मुलीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
आकांक्षा नितीन साळवे (वय २१) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिचे वडील नितीन गिरधारी साळवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात विनायक अतिश कांबळे (वय २६) आणि आर्यन विजय शिंदे (वय १८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपी संदेश संजय जाधव (वय ३०) याच्यासह इतर साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फटाक्यावरून सुरू झाला वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे रिक्षाचालक असून दिवाळीनिमित्त नातेवाईकांची भेट घेऊन पत्नी आणि मुलीसह घरी परतत होते. यावेळी त्यांच्या इमारतीत राहणारे संजय जाधव आणि त्यांचा जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे रस्त्यावर फटाके फोडत होते. दरम्यान, उबाळे याने लावलेल्या फटाक्यावरून साळवे यांच्या रिक्षाचे चाक गेले. याच कारणावरून उबाळे याने साळवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मात्र, काही वेळात हा वाद शांत झाला आणि दोन्ही बाजूचे लोक घरी निघून गेले.
मध्यरात्री मित्रांसह येऊन केली मारहाण
मात्र, या वादाचा राग आरोपींनी मनात कायम ठेवला होता. ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास नितीन साळवे हे होप हॉस्पिटलजवळ उभे असताना संदेश जाधव आपल्या तीन मित्रांसह तिथे आला. साळवे यांना पाहताच त्याने फटाक्याच्या वादाचा उल्लेख करत साथीदारांना त्यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर चौघांनी साळवे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
वडिलांना वाचवताना मुलीच्या डोक्यात वार
वडिलांचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी, दोन्ही मुली आणि भाचा घटनास्थळी धावले. कुटुंबीयांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान आरोपी विनायक कांबळे याने धारदार शस्त्र बाहेर काढून नितीन साळवे यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या आकांक्षाच्या डोक्यावर हा वार बसला.
या हल्ल्यात आकांक्षाला गंभीर दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती घटनास्थळीच बेशुद्ध पडली. ही परिस्थिती पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी आकांक्षाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, समर्थ पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दिवाळीच्या फटाक्यांवरून सुरू झालेल्या वादातून एका तरुणीला गंभीर दुखापत झाल्याने नाना पेठ परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.