सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
  • मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
 क्राईम

संपत्तीच्या वादातून कल्याणमध्ये रक्ताचे नाते झाले रक्तरंजित! मुलाचा वडील आणि सख्ख्या भावावर गोळीबार; पत्नीसह आरोपी अटकेत

डिजिटल पुणे    12-11-2026 13:52:30

ठाणे : संपत्तीच्या वादातून कौटुंबिक नात्यांनाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याण तालुक्यातील गुरवली पाडा परिसरात घडली आहे. मालमत्तेच्या वादातून एका मुलाने स्वतःच्या वडिलांसह सख्ख्या भावावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वडील बाळाराम शेलार आणि भाऊ भरत शेलार गंभीर जखमी झाले असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (१० नोव्हेंबर) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी गोळीबार केल्याच्या आरोपाखाली कल्पेश शेलार आणि त्याची पत्नी रसिका शेलार यांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर दोघांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण आणि गोळीबारात वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत पोलीस तपास करत आहेत. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण; तक्रार मागे घेण्यासाठी मामालाही धमकावत हल्ला

कल्याण : घरासमोर हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून काही तरुणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात घडली आहे. एवढेच नव्हे, तर या मारहाणीची पोलिसांत तक्रार केल्यामुळे तक्रार मागे घेण्यासाठी संबंधित तरुणांनी पीडित व्यक्तीच्या मामालाही मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोघे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुमार हे कामावरून घरी परतत असताना मोहने परिसरातील रस्त्यावर गर्दी होती. त्यामुळे त्यांनी वाहनाचा हॉर्न वाजवला. त्यावेळी रस्त्यावर काही तरुण फटाके फोडत उभे होते. हॉर्न का वाजवला, असा जाब विचारत या तरुणांनी अनिल कुमार यांच्याशी वाद घातला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर अनिल कुमार यांनी आपले मामा संजय विराने यांच्यासोबत खडकपाडा पोलीस ठाणे गाठून संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांत तक्रार का केली, ती तातडीने मागे घे, असा दबाव संबंधित तरुणांकडून टाकण्यात आला. त्यानंतर आज सकाळी अनिल कुमार यांचे मामा संजय विराने यांनाही मारहाण करण्यात आली.

या प्रकारामुळे मोहने परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. किरकोळ कारणांवरून रस्त्यावर दादागिरी आणि मारहाणीचे प्रकार वाढत असल्याने अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती