नागपूर : मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघाताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ४ नोव्हेंबरच्या रात्री कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या दुर्घटनेत नागपूर येथील रेहान अली ऊर्फ झिदान या तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. या अपघातानंतर भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या मुलाच्या उपस्थितीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, अपघातग्रस्त वाहन आमदार परिणय फुके यांच्या मालकीचे असून अपघाताच्या वेळी त्यांचा मुलगा यथार्थ फुके वाहन चालवत होता. तसेच वाहनातील तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मात्र, फुके कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या दिवशी घटनास्थळी दोन चारचाकी वाहने होती. दोन्ही वाहनांचे चालक व्यावसायिक होते. यथार्थ फुके हा पुढील वाहनात प्रवास करत होता. त्या वाहनाचा कोणताही अपघात झाला नाही. तर मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या वाहनात रेहान अली प्रवास करत होता. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असा दावा निकटवर्तीयांनी केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारला सवाल
या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. एका तरुणाचा जीव गेला असताना राजकीय दबावातून प्रकरण दडपण्याचा किंवा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. आमदाराचा मुलगा असला तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सुषमा अंधारे यांचाही गंभीर आरोप
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या अपघातावरून भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संकटाचा सामना करत असताना काही लोकप्रतिनिधींची मुले भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अपघातग्रस्त वाहन आमदार परिणय फुके यांच्या नावावर असून ते त्यांचा मुलगा यथार्थ चालवत होता, असा दावा त्यांच्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. वाहनातील तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांच्या अधिकृत खुलाशाकडे लक्ष
दरम्यान, या प्रकरणाची नोंद मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, घटनास्थळी नेमकी किती वाहने होती, अपघातग्रस्त वाहन कोण चालवत होते आणि यथार्थ फुके यांचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
एकीकडे विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात असताना दुसरीकडे फुके कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी पोलिसांच्या तपासाकडे आणि अधिकृत खुलाशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.