सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
  • मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
  • मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
 क्राईम

नायगावमध्ये तरुणीची छेड काढून लोकलसमोर ढकलले; प्रसंगावधानामुळे वाचला जीव, मात्र डावा हात गमावला!

डिजिटल पुणे    12-11-2026 18:59:46

मुंबई : मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नायगाव रेल्वे स्थानकावर एका तरुणीची छेड काढल्यानंतर तिने विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने तिला थेट लोकल ट्रेनसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तरुणीचा जीव थोडक्यात बचावला; मात्र तिचा डावा हात गंभीर जखमी झाला असून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रकरणातील ५३ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, लोकलमधील गर्दीमुळे ती दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात बसली होती. नायगाव स्थानक जवळ येत असताना डब्यातील एका पुरुषाने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संबंधित व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याला विरोध करत तिने आरोपीला जाब विचारला. तसेच, त्याच्या वर्तनाचा निषेध करत हातातील चप्पल काढली.

मात्र, याचाच राग मनात धरून आरोपीने नायगाव स्थानकाच्या फलाटावर उतरलेल्या तरुणीला लोकलच्या दिशेने ढकलले. त्यामुळे ती दोन डब्यांमधील मोकळ्या जागेत रेल्वे रुळांवर पडली. त्याचवेळी लोकल सुरू झाली. अंगावरून ट्रेन जाऊ नये आणि जीव वाचावा, यासाठी तरुणीने प्रसंगावधान राखत रुळांवरच आडवे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिचा जीव वाचला; मात्र या भीषण घटनेत तिचा डावा हात ट्रेनखाली आल्याने गंभीर दुखापत झाली.

उपचारादरम्यान १६ टाके; रेल्वे प्रशासनावरही नाराजी

अपघातानंतर जखमी तरुणीला सुरुवातीला वसई येथील जनसेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील कूपर रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या हाताला १६ टाके पडले असून पुढील उपचारांसाठी आणखी एका शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे तिने सांगितले.

या संपूर्ण घटनेनंतर तरुणीने रेल्वे प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. घटनेनंतर अपेक्षित मदत मिळाली नाही, तसेच सुरुवातीला उपचार मिळवण्यासाठीही अडचणी आल्याचा आरोप तिने केला आहे.

४ नोव्हेंबरला घटना, ९ नोव्हेंबरला आरोपीला अटक

ही घटना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून ४ मिनिटांनी नायगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर घडली. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे समजले जात होते. मात्र, ६ नोव्हेंबर रोजी कूपर रुग्णालयात पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला.

पीडितेच्या जबाबाच्या आधारे भाईंदर जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०६१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६७, ११७(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त कारवाईत आरोपी जेरबंद

या प्रकरणाचा तपास करताना भाईंदर जीआरपी आणि आरपीएफ वसई रोड यांच्या संयुक्त पथकाने आरोपीचा शोध घेतला. अखेर ९ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी ५३ वर्षांचा असून तो नायगाव पूर्व, पालघर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या आरोपी भाईंदर जीआरपीच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवासादरम्यान छळवणूक किंवा कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास प्रवाशांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा रेल मदतच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती