सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
 जिल्हा

शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताच एकनाथ शिंदे सरसावले! थेट फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; उत्तर माणमधील १५ गावांना दिलासा मिळण्याची आशा

डिजिटल पुणे    13-11-2026 15:50:30

बिजवडी : उत्तर माण तालुक्यातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. शेतकऱ्यांशी फोनद्वारे थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर शिंदे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर माणमधील शेतकऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पाण्याची कमतरता, शेतीसमोरील अडचणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शिंदे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी थेट संपर्क साधला. उत्तर माणमधील शेतकऱ्यांना अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, बिजवडी, मोगराळे, राजवडी, जाधववाडी, तोंडले, येळेवाडी, पाचवड, हस्तनपूर, अनभुलेवाडी, परकंदी, वारुगड, दानवलेवाडी, डंगीरवाडी, वावरहिरे आणि मोही या १५ गावांचा पाणीपुरवठ्याच्या नियोजनात समावेश करावा, अशी मागणी अक्षयमहाराज भोसले यांनी केली.

याशिवाय, परिसरातील पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याचा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.

याबाबत बोलताना अक्षयमहाराज भोसले म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून, समस्या समोर आल्यानंतर केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाहीवर भर देतात. उत्तर माणमधील शेतकऱ्यांसाठी टँकरची संख्या वाढविणे तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भोसले यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित गावांबाबत कार्यवाही सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

उत्तर माणमधील पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर आता प्रशासनाकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती