मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाला सध्या अनुकूलता नसल्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही विलीनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत यापुढे या विषयावर बोलणार नसल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का, याबाबतही विविध राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे.
सुनेत्रा पवारांचा विलीनीकरणाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होऊ नये, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. याबाबत त्यांनी राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनाही आपली भूमिका कळवल्याचे सांगितले जात आहे.
दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भविष्यात पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विलीनीकरणाला आमची मान्यता नसल्याचे सुनेत्रा पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे महायुतीचा घटक म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास त्याला आमचा विरोध नसेल, अशी भूमिका असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.
त्यामुळे विलीनीकरणाऐवजी स्वतंत्र पक्ष म्हणून सत्तेत सहभागी होण्याच्या पर्यायावर शरद पवार यांच्या पक्षात चर्चा सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
‘अजितदादा होते तोपर्यंतच विलीनीकरणाची चर्चा होती’; सुप्रिया सुळेंचा स्पष्ट खुलासा
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत विलीनीकरणाच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. या चर्चांचा आता कंटाळा आला असून, यापुढे या विषयावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हयात होते, तोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. त्यासाठी तारीखही निश्चित झाली होती. पक्षातील पदाधिकारी आणि अजित पवार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. त्याचे व्हिडीओदेखील माध्यमांमध्ये दाखवण्यात आले होते.
मात्र, ज्या दिवशी अजित पवार यांचे निधन झाले, त्याच दिवशी विलीनीकरणाच्या विषयाला आपल्या मनात आणि पक्षात पूर्णविराम मिळाला. त्यानंतर आमच्या पक्षाकडून विलीनीकरणाबाबत कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. अजित पवार यांच्या गटाकडून आलेल्या विधानांवरही आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
‘विलीनीकरणावर आजच चर्चा करून विषय संपवा’
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर वारंवार प्रश्न विचारले जात असल्याबद्दलही सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. आज या विषयावर जे काही प्रश्न आहेत, ते सर्व विचारून घ्या आणि आजच हा विषय संपवून टाका. यापुढे मी विलीनीकरणाबाबत बोलणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांची विलीनीकरणाबाबतची कथित भूमिका आणि सुप्रिया सुळे यांनी केलेला स्पष्ट खुलासा पाहता, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात दोन्ही पक्षांची स्वतंत्र राजकीय वाटचाल कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
