पुणे : पुणे शहरात आता थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तविला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी पुणेकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागू शकतो.
शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पुणे शहराचे किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका असे संमिश्र हवामान सध्या अनुभवायला मिळत आहे.
शहराच्या तुलनेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) परिसरात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. शुक्रवारी एनडीए परिसरात किमान तापमानाची नोंद ११.९ अंश सेल्सिअस इतकी झाली. दुसरीकडे, चिंचवड आणि मगरपट्टा येथे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. तर लोहगाव परिसरात १६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी (१४ नोव्हेंबर) कमाल तापमानात विशेष बदल होणार नसून किमान तापमानात किंचित घट होऊन ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री व पहाटे थंडीचा कडाका असे वातावरण कायम राहू शकते. त्यामुळे पुणेकरांनी विशेषतः पहाटे आणि रात्री घराबाहेर पडताना थंडीपासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
