सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
  • विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना
 जिल्हा

पंढरपुरात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा मृत्यू; 24 तासांच्या बचावकार्यानंतर NDRF कडून मृतदेह बाहेर

डिजिटल पुणे    16-11-2026 12:47:51

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीच्या कामादरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेत चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप करण्यासाठी मजूर विहिरीत उतरले असताना अचानक दगड आणि मातीचा ढिगारा कोसळला. त्यामुळे चारही मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तब्बल 24 तास चाललेल्या बचावकार्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने चारही मजुरांचे मृतदेह बाहेर काढले.

ही दुर्घटना शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतातील विहिरीत घडली. सुमारे 50 फूट खोल असलेल्या विहिरीचे मोजमाप सुरू असताना अचानक विहिरीचा कठडा आणि दगड-मातीचा भाग कोसळला. सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत मंगेश मोरे (35), सिद्धेश्वर घाडगे (45), आबासाहेब घोडके (50) आणि तानाजी घोडके (54) हे चार मजूर अडकले होते. यातील दोन मजूर आंबे गावातील, तर दोन आणवली गावातील रहिवासी होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगारा हटवून मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. सुरुवातीला दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित मजुरांचे मृतदेहही बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. अखेर 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चारही मजुरांचा शोध पूर्ण झाला.

मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही मजुरांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. या घटनेमुळे चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृत मजुरांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

विहीर दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन होणार

या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. विहिरीचे खोदकाम नियमांनुसार झाले होते का, आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का आणि खोदकामादरम्यान करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमध्ये काही निष्काळजीपणा झाला होता का, याची तपासणी केली जाणार आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या दगडांची तसेच त्यावर असलेल्या रासायनिक पदार्थांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील सुरू असलेल्या विहीर खोदकामांचे सर्वेक्षण करून परवानगी घेतलेल्या आणि विनापरवानगी सुरू असलेल्या कामांची माहिती संकलित केली जाणार आहे.

आंबे गावातील या दुर्घटनेने विहीर खोदकामादरम्यान कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चार मजुरांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बाबींचा तपास आता प्रशासनाकडून केला जाणार आहे.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती