सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
  • विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना
 जिल्हा

मुंबई ते कोकण आता अवघ्या सव्वा तासात! नवी मुंबई–चिपी विमानसेवा सुरू; तिकीट दर किती?

डिजिटल पुणे    16-11-2026 13:34:36

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान आजपासून (१६ नोव्हेंबर) नियमित विमानसेवेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईहून थेट कोकणात पोहोचणे आता अधिक सोपे आणि जलद होणार आहे. रस्ते आणि रेल्वे प्रवासासाठी लागणारा अनेक तासांचा वेळ वाचणार असून, अवघ्या १ तास १० मिनिटांत नवी मुंबईहून चिपी विमानतळावर पोहोचता येणार आहे.

ही विमानसेवा 'फ्लाय ९१' या विमान कंपनीकडून चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे आठवड्यातील सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

विमानाचे वेळापत्रक काय?

नवी मुंबई विमानतळावरून दररोज सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी विमान चिपीसाठी उड्डाण करेल. हे विमान सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी चिपी विमानतळावर दाखल होईल. तर चिपी येथून परतीचे विमान सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण करून १० वाजून ३५ मिनिटांनी नवी मुंबईत पोहोचेल.

या विमानाची प्रवासी क्षमता ७२ इतकी आहे. त्यामुळे कमी वेळेत मुंबई आणि सिंधुदुर्ग यांच्यात थेट हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे.

विमान तिकीटाचे दर किती?

नवी मुंबई ते चिपी विमान प्रवासासाठी तिकिटांचे दर अंदाजे ३,५०० ते ७,५०० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवासाची तारीख, तिकिटांची मागणी आणि उपलब्धतेनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो.

चिपी विमानतळाच्या विकासाला मिळणार चालना

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी झाले होते. सुरुवातीला मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर अलायन्स एअरची विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबर २०२४ मध्ये ही सेवा बंद झाली. त्यानंतर 'फ्लाय ९१' कंपनीकडून पुणे, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली.

आता नवी मुंबईशी थेट विमानसेवा सुरू झाल्याने चिपी विमानतळाच्या वापराला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

कोकणच्या पर्यटन आणि रोजगारालाही फायदा

नवी मुंबई ते चिपी थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. मुंबईत नोकरी किंवा व्यवसायानिमित्त राहणाऱ्या कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी आता जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच गणपती उत्सव, सुट्ट्या आणि पर्यटनाच्या हंगामात प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, स्थानिक वाहतूक आणि रोजगाराच्या संधींनाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, ही सेवा नियमित आणि अखंडित सुरू राहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती