सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
  • विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना
 जिल्हा

विमानतळामुळे पर्यटनासह स्थानिक तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार ;ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव

डिजिटल पुणे    16-11-2026 17:12:43

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारी आणि जिल्हावासीयांसाठी दळणवळणाची महत्त्वपूर्ण सुविधा ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा दोन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर आज पुन्हा सुरू झाली. या विमानसेवेच्या शुभारंभानिमित्त चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे औक्षण करून पुष्प व मिठाई देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला त्यांच्या हस्ते बोर्डिंग पासचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. सुरू झालेली ही विमानसेवा भविष्यात कधीही बंद पडणार नाही, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर फ्लाय ९१ कंपनीच्या विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, प्रभाकर सावंत, अबीद नाईक, कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर उज्ज्वल व्हावा, जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची आर्थिक प्रगती व्हावी, हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयांशी संपर्क, पत्रव्यवहार तसेच केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली. जिल्ह्याला पर्यटनाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

विमानतळ सुरू करण्याचा प्रवास सोपा नव्हता. यापूर्वी विमानसेवा सुरू झाली होती; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ती बंद पडली. विमान कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या धावपट्टी, वेळेची मर्यादा, रस्ते, जागेची उपलब्धता आणि विशेषतः रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा अशा विविध बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते. गेल्या दोन वर्षांत या सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या विमान कंपन्यांनाही सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा देणे शक्य होणार आहे.

लहान शहरांमधील विमानतळांवर विमानसेवा सातत्याने सुरू ठेवण्यासाठी विमान कंपन्यांना शासनाच्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने सिंधुदुर्ग विमानतळासाठी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. विमानतळासाठीचा विशेष प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडून त्यास मान्यता मिळविण्यात आली. आर्थिक तरतुदीच्या कालमर्यादेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला. मंत्रिमंडळाची पूर्वलक्षी मान्यता मिळवून विमानसेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. त्यामुळे महत्त्वाचा कालावधी वाचविणे शक्य झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.विमानतळाकडे केवळ प्रवासाची सुविधा म्हणून पाहू नये. या विमानतळामुळे जिल्ह्यात रोजगाराची असंख्य साधने उपलब्ध होणार आहेत. पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होतील. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी टुरिस्ट गाड्या, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि विविध सेवा स्थानिक तरुण-तरुणींच्या मालकीच्या असाव्यात. बाहेरील व्यावसायिकांपेक्षा जिल्ह्यातील तरुणांना या संधींचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. शासनाच्या उर्वरित तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासाची अनेक कामे पूर्ण करण्याचा निर्धार आहे. विमानसेवा पुन्हा खंडित होऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

आमदार नीलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग विमानतळ पुन्हा सुरू करणे हे आव्हानात्मक काम होते. मुंबई, नवी मुंबई आणि गोव्यातील मोपा विमानतळामुळे निर्माण झालेली स्पर्धा तसेच विविध तांत्रिक अडचणी लक्षात घेता चिपी विमानतळावर पुन्हा विमानसेवा सुरू करणे सोपे नव्हते. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे शक्य करून दाखविले. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हावासीयांना हा ऐतिहासिक दिवस अनुभवता येत आहे.आमदार दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विमानतळ सुरू होणे ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे. यापूर्वीही मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. त्यानंतर अन्य विमानसेवाही सुरू झाल्या; मात्र मुंबई ही कोकणची महत्त्वाची जोडणी असल्याने मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणे आवश्यक होते. जवळपास दोन वर्षांच्या खंडानंतर ही सेवा सुरू होत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही सेवा सुरू होत असून, या योजनेत विमान तिकिटाच्या दरामध्ये शासनाकडून सुमारे तीन हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही विमानप्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती