मुंबई : सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्करांकडून नवनवीन शक्कल लढवली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 26 लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. विशेष म्हणजे, तस्करांनी ब्लूटूथ स्पीकर आणि इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये सोने लपवून आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात दोन प्रवाशांना अटक करण्यात आली असून कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने 16 आणि 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्री विमानतळावर चार स्वतंत्र प्रकरणांमध्ये ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकूण 1 किलो 910 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत अंदाजे 2.26 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या विटा तसेच सोन्याचे तुकडे यांचा समावेश आहे.
ब्लूटूथ स्पीकर आणि इस्त्रीचा तस्करीसाठी वापर
सोन्याची तस्करी करण्यासाठी आरोपींनी वेगळीच युक्ती वापरली होती. ब्लूटूथ स्पीकर आणि इलेक्ट्रिक इस्त्री यांसारख्या उपकरणांमध्ये सोने लपवून ते विमानतळावरून बाहेर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याशिवाय 22 कॅरेट सोन्याचे कच्चे दागिनेही अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
ठाण्यात 11 कोटींच्या ड्रग्जचा साठा उद्ध्वस्त
दरम्यान, दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात मुंब्रा पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. बेतवडे गावातील मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड सोसायटीच्या औरा इमारतीतील 36 व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक 3602 मध्ये पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 11 कोटी रुपये किमतीचे कोकेन आणि मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे.
परदेशी नागरिकांकडून परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. पंच आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत संबंधित फ्लॅटची झडती घेण्यात आली.
तीन परदेशी नागरिकांना अटक
झडतीदरम्यान फ्रिजवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यात वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळली. तपासणीत ती कोकेन आणि एमडी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी 2 किलो 278 ग्रॅमपेक्षा अधिक अंमली पदार्थांसह रिकामे प्लास्टिक पाऊच, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दोन मोबाईल फोन, पासपोर्ट आणि रोख रक्कम जप्त केली.
या प्रकरणी चुकवुएमेका इमॅन्युएल न्वाक्वो आणि त्याची पत्नी युकेरिया चुकवुएमेका ओबियानुजु या दोन नायजेरियन नागरिकांना, तसेच एका टांझानियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा तपास सुरू
दिवा परिसरातील एका निवासी इमारतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या ड्रग्जचा पुरवठा कुठून केला जात होता, यामागे आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे आहे का आणि या नेटवर्कचे स्थानिक स्तरावर कोणाशी संबंध आहेत, याचा शोध आता मुंब्रा पोलीस घेत आहेत. दोन्ही घटनांमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील तस्करीविरोधी कारवायांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.
