मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कोरोना काळातील परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका करत त्यांना 'चकाट्या पिटणारा गृहमंत्री' असे संबोधले. आता या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या 'मफलर मॅन' आरोपावरही शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली.
'खरा थापाडा कोण?' म्हणत शिंदेंचा ठाकरेंना सवाल
पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता एकनाथ शिंदे यांनी 2019 मधील सत्तास्थापनेच्या राजकारणाचा संदर्भ देत ठाकरेंवर पलटवार केला. 2019 मध्ये महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेशी खोटे बोलण्यात आले. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. मग खरा मोठा थापाडा कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केल्याने काही जणांना मोठे झाल्यासारखे वाटते. मुघलांच्या घोड्यांना संताजी-धनाजी दिसत होते, त्याचप्रमाणे काहींना मोदी फोबिया झाला आहे, अशी बोचरी टीकाही शिंदेंनी केली. राजकारण करण्याऐवजी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे. दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील जनतेला कोणाचा खोटारडेपणा आहे, हे चांगलेच समजले आहे, असेही ते म्हणाले.
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर शिंदेंचे प्रत्युत्तर
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकासंदर्भात गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबंधित विमान कंपनीच्या मालकाला वाचवत असल्याचा दावा करत त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख 'मफलर मॅन' असा केला होता.रोहित पवारांच्या या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला. एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे किंवा त्याच्या लग्नाला उपस्थित राहणे म्हणजे त्या व्यक्तीला पाठिंबा देणे असा अर्थ होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमच्यासोबत दररोज अनेक जण फोटो काढतात. आरोप करणाऱ्यांसोबतही अनेक लोकांचे फोटो असतील. केवळ फोटोच्या आधारावर कोणावरही आरोप करणे योग्य नाही. रोहित पवार यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता आरोप केले आहेत, असे म्हणत शिंदेंनी त्यांच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले.दरम्यान, अमित शाह यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आणि रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
