लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरी बस आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. भरधाव लक्झरी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तीन तृतीयपंथीय गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. सोमवारी (१६ नोव्हेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील हॉटेल सत्कार ग्रँड लॉजसमोर ही घटना घडली.
या अपघातात रुबीना ताज (वय ४५), सानिया (वय ३८) आणि कवाना (वय ३०) या तिघी जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने कुंजीरवाडी येथील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी नासिर फरीदशहा जमादार (वय ४७, रा. मिरज, जि. सांगली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासिर जमादार हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून सात तृतीयपंथीयांना घेऊन मिरज येथून थेऊरमधील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित संमेलनासाठी आले होते. पहाटे लवकर पोहोचल्यामुळे फ्रेश होण्यासाठी खोली उपलब्ध आहे का, याची चौकशी करण्यासाठी त्यांनी हॉटेल सत्कार ग्रँड लॉजसमोर वाहन थांबवले होते. यावेळी जमादार हे अन्य दोघांसह लॉजमध्ये गेले, तर पाच जण टेम्पो ट्रॅव्हलरमध्येच थांबले होते.
दरम्यान, हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्स इंडिया कंपनीच्या लक्झरी बसने (एमपी ०१ झेडजी ९९२२) उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की वाहनातील तिघांना गंभीर दुखापत झाली, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बसचालकाविरोधात गुन्हा दाखल
बसचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने बस चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी बसचालक मोहम्मद समीर खाशीनसाहब मुल्ला (वय २६, रा. एरंडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) याच्याविरोधात मोटार वाहन अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत